मुंबई - गेले अडीच महिने बंद असलेली मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल आजपासून सुरू झाली आहे. मात्र, ही लोकलची सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आहे. आज पहाटे ५.३० नंतर लोकलसेवेला प्रारंभ झाला.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर लोकल सुरू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना त्यांचे ओळखपत्र दाखवून प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर आज सकाळी 5.30 वाजता पहिली लोकल सुटली. तर रात्री 11. 30 वाजता शेवटची लोकल सुटणार आहे. प्रत्येक फेरीमध्ये 15 मिनिटांचे अंतर असणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. राज्यात रविवारी रात्रीपर्यंत एकूण १,०४,५६८ कोरोनाबाधितांची संख्या नोंदविण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईची लोकल बंद करण्यात आली होती. मात्र, टाळेबंदी शिथील केल्यानंतर अत्याश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्या मागणीची दखल घेत केंद्र सरकारने लोकल सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. असे असले तरी लोकलमध्ये सामान्य मुंबईकरांना प्रवेश मिळणार नाही. कारण, ही सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आहे.