मुंबई - राज्यातील कोरोनाचा प्रसार कमी होत असल्याने राज्य सरकारने (State Government) १ डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निवर्णय घेतला आहे. मात्र मुंबईमधील शाळा १५ डिसेंबरपासून सुरु केल्या जाणार आहेत. शाळा सुरु करताना पालकांची परवानगी घेणे गरजेचे असल्याने शाळा उशिरा केल्या जाणार आहेत. १५ डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या शाळांमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने विद्यार्थी सहभागी होऊ शकतात अशी माहिती पालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली.
तयारी करण्यासाठी उशीर -
राज्यातील शाळा १ डिसेंबरपासून सुरु करण्याबाबत जीआर कालच मिळाला आहे. जगातील काही देशांमध्ये ओमिक्रोन (Omicron Variant) या कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरियंटचा प्रसार झाल्याने लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईची एकूण लोकसंख्या तसेच या शहरात जगभरातून लोकांचे येणे जाणे सुरु असल्याने या नव्या प्रकारचा प्रसार होऊ नये यासाठी पालिकेकडून विशेष काळजी घेतली जात आहे. यासाठी शाळा सुरु करायच्या झाल्यास इमारतीचे निर्जंतुकीकरण करणे, विद्यार्थ्यांना मास्कसाठी खरेदी, मास्कचे विद्यर्थ्यांना वाटप करणे, शाळांमध्ये सुरु असलेली कोविड लसीकरण केंद्र बंद करणे आदी तयारी करावी लागणार असल्याचे तडवी यांनी संगितले.
पालकांचे संमती पत्र घ्यावे लागणार -
मुंबईमध्ये १ ते ७ वीच्या वर्गात सुमारे ३ लाख विद्यार्थी शिकत आहेत. या विद्यार्थ्यांच्या पालकांची शाळा सुरु करण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागणार आहे. या वर्गातील विद्यार्थी लहान वयाचे असल्याने त्यांच्या पालकांनी परवानगी दिली तरच त्यांना शाळेत ऑलाईन पद्धतींने शिकवले जाईल. ज्या पालकांना आपल्या मुलांना शाळेत पाठवायचे नसेल त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जाईल. या कालावधीत सर्व शाळांच्या इमारती सॅनिटाईज करू स्वच्छ केल्या जातील असे तडवी यांनी सांगितले.
असे असतील नियम -
- शाळा सुरु केल्यावर एका बेंचवर एका विद्यार्थी असेल.
- शाळेत २ ते ३ तास विद्यार्थी येतील
- दोन सत्राच्या मधल्या वेळात शाळा सॅनिटाईज केल्या जातील
- विद्यार्थ्यांना शाळेत मास्क घालावे लागेल
- सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे लागणार
- जे विद्यार्थी शाळेत येतील त्यांना ऑफलाईन शिक्षण तर जे विद्यार्थी शाळेत येणार नाहीत त्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जाणार
हेही वाचा - Special Story : काय सांगता?.. यवतमाळच्या अब्बासने कागदावर उकळला चहा