मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकारण सुरू आहे. लसीचा तुटवडा असल्याने पालिकेकडून स्पुटनिक लसीबाबत विचारणा सुरू आहे. पालिकेकडून कोव्हिशील्ड आणि कोवॅक्सिन लसीसाठी कोल्डस्टोरेज उभारण्यात आले आहे. आता स्पुटनिक लसीसाठीही कोल्डस्टोरेज उभारले जाईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. मुंबई स्पुटनिक लसीसाठी रेड्डीज लॅबवर अवलंबून असल्याचे महापौरांनी सांगितले.
हेही वाचा - मुंबईत मान्सूनची हजेरी; वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू
जम्बो कोल्ड स्टोरेज उभारणार
मुंबईमध्ये लसीचा तुटवडा असल्याने पालिकेने ग्लोबल टेंडर काढले होते. यात सहभागी झालेल्या पुरवठादारांना लस उत्पादक कंपनीसोबत कायदेशीर बाबी सिद्ध करता न आल्याने या पुरवठादारांना बाद करण्यात आले. याच दरम्यान पालिकेने रशियाच्या स्फुटनिक लस बनवणाऱ्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी सोबत चर्चा सुरु केली आहे. जूनच्या शेवटी काही प्रमाणात लस देण्याचे मान्य केल्याने ती लस ठेवण्यासाठी लागणारे कोल्ड स्टोरेज उभारावे लागणार आहे. कंपनीने दिलेल्या सूचनेनुसार कोल्ड स्टोरेज उभारले जाईल. पालिकेने कांजूरमार्ग येथे लस साठवणूक केंद्र उभारले आहे, त्याच प्रमाणे स्पुटनिक लसीसाठी कोल्ड स्टोरेज उभारले जाईल. मुंबई शहर, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरांसाठी सोयीस्कर असेल अशा ठिकाणी स्पुटनिक लसीच्या साठवणुकीसाठी जम्बो कोल्ड स्टोरेज उभारणार असल्याची माहिती महापौरांनी दिली.
लहान मुलांवर लसीचे प्रयोग
नागपूरमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये लहान मुलांवर लसीचे प्रयोग केले जात आहेत. मुंबई महापालिकेला अशी परवानगी मिळावी यासाठी केंद्राकडे आधीच संपर्क केला आहे. मात्र, अद्याप परवानगी मिळालेली नाही, असे महापौरांनी सांगितले.
नालेसफाई बैठक
आज ४ वाजता नालेसफाईबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांची विशेष बैठक होईल. विरोधकांसारखे नुसतेच आरोप करण्यापेक्षा समोरच्या आव्हानांवर उपाययोजना शोधल्या जातील. मान्सूनपूर्व तयारी, नालेसफाई यांबाबत महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल, असे पेडणेकर म्हणाल्या.
हेही वाचा - नागपुरात देवेंद्र फडणवीसांवर अनेक गुन्हे दाखल - वकील सतीश उके