मुंबई - अवघ्या दोन महिन्यांवर पावसाळा येऊन ठेपलेला आहे. पावसाळ्यात उपनगरी रेल्वे सेवेत कोणताही अडथळा यायला नको म्हणून मध्य आणि पश्चिम रेल्वेने कंबर कसलेली आहे. रेल्वे मार्गावरील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी उपनगरीय रेल्वे मार्गावर 260 पंप बसविण्यात येणार ( Mumbai Railway Install Pumps ) आहेत.
या ठिकाणी पावसाचे साचते पाणी - पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने मुंबई उपनगरातील लोकल सेवेवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे प्रवाशांना सुद्धा मोठ्या प्रमाणात समस्यांना तोंड द्यावे लागते. यावर्षी रेल्वे रुळावरून साचलेले पाणी काढण्यासाठी मध्य रेल्वे 118 आणि पश्चिम रेल्वे 142 असे एकूण 260 हाय पॉवर पंप मशीन बसविणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील मज्जिद सँनडहर्स्ट रोड, भायखळा, चिंचपोकळी ते करी रोड, परळ, दादर ते शीव, कुर्ला, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड व ठाणे, तसेच हार्बर मार्गावरील टिळकनगर, चुनाभट्टी, गुरू तेग बहादूर नगर याठिकाणी पाणी साचून रेल्वे सेवा विस्कळीत होते. तर, पश्चिम रेल्वे मार्गावरील ग्रांट रोड, प्रभादेवी, दादर, माटुंगा रोड, माहीम यार्ड, वांद्रे, खार, अंधेरी, जोगेश्वरी आणि वसई-विरार या भागात पाणी साचण्याच्या घटना होतात. त्यामुळे या भागातून पाण्याचा उपसा करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून हाय पॉवर पंप मशीन बसविण्यात येत आहे.
नालेसफाईचे काम युद्धपातळीवर - रेल्वे मार्गावरील ज्या भागात पावसाळ्याचे पाणी साचते, त्या भागातील रेल्वे रुळांची उंची वाढवण्याचे काम मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेकडून सुरू आहे. याशिवाय रेल्वे रुळा खालून आणि त्यांच्या बाजूने जाणाऱ्या नाल्यांच्या सफाईचेही काम रेल्वेने हाती घेतले आहे. दरम्यान, 55 नालेसफाईची कामे हाती घेण्यात आली असून, त्यापैकी 12 कामे प्रगतीपथावर आहेत. सीएसएमटी ते कल्याण, वाशी, कुर्ला भागात एकूण 60 किमी पट्यातील रेल्वे रुळांची उंची वाढविण्यात येत आहे.
हेही वाचा - Ajit pawar : मोबाईल रिचार्ज प्रमाणे विजेसाठी प्रिपेड कार्ड आणण्याचा राज्य सरकारचा विचार - अजित पवार