मुंबई - राज्यासह मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अधिक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र तरी देखील नागरिक रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत. त्यामुळे आता वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई पोलिसांकडून कलर कोड व्यवस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. मुंबईत रस्त्यावर धावणाऱ्या खासगी वाहनांवर आता कलर कोड लावण्यात येणार आहेत. त्यामुळे रस्त्यांवर आता फक्त कलर कोड असलेली वाहनेच धावणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे.
'अशी' असेल नवी कलर कोड व्यवस्था
इतर अत्यावश्यक सेवेत असलेल्या वाहनांवर पिवळा कलर कोड लावण्यात येणार असून, अत्यावश्यक मेडिकल सेवा देणाऱ्या वाहनांवर लाल कलर कोड असणार आहे. या बरोबरच भाजीपाल्याच्या वाहनांवर हिरवा कोड लावण्यात येणार आहे. ज्या वाहनांवर कलर कोड असेल त्याच वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी असणार आहे. तसेच त्या वाहनाचा दुसऱ्या कोणत्या कामासाठी उपयोग झाल्यास संबंधित व्यक्तीवर कडक कारवाईचा इशार पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. मुंबई पोलिसांकडून सदरचे कलर कोड जारी करण्यात आले असून, स्थानिक पोलीस ठाण्यातून हे कलर कोड मिळणार आहेत. या नव्या पद्धतीमुळे विनाकारण फिरणाऱ्यांवर आळा बसणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा - धक्कादायक..! मुंबईत कोरोनाग्रस्तांचा टॅक्सी अन् रेल्वेतून प्रवास