मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची लोकसंख्या 1 कोटी 80 लाख आहे. या सर्वांची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जबाबदारी ही मुंबई पोलिसांवर आहे. स्कॉटलंड यार्ड पोलिसांनंतर जगात जर कोणाची तुलना केली जात असेल तर ती मुंबई पोलिसांची. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई शहरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या शहराच्या सुरक्षेसाठी अमुलाग्र बदल करण्यात आले आहेत. त्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट...
26/11 नंतर मुंबईत 4800 डिजिटल सीसीटीव्ही कॅमेरे -
26/11 नंतर केवळ मनुष्यबळ व अत्याधुनिक हत्यारच मुंबई पोलिसांना देण्यात आलेली नसून डिजिटल माध्यमांवरसुद्धा मुंबई पोलिसांना अधिक सक्षम करण्यात आले आहे. सध्या मुंबई पोलीस खात्यात 94 पोलीस ठाणी येत असून, 26 /11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई शहरात तब्बल 4800 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रोजेक्ट राबवण्यात आला. या 4800 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून मुंबईतल्या कानाकोपऱ्यात मुंबई पोलिसांचा पोहचत येते.
सीसीटीव्हीमुळे गुन्हे तपासात होते मदत
एक काळ असा होता की मुंबई शहरात चैन स्नॅचिंग, दिवसाढवळ्या रॉबरी व मारामारी किंवा खून दरोडाचे प्रकार घडत होते. मात्र, शहरात लावण्यात आलेल्या 4800 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्या परिसरातील कानाकोपऱ्यात नजर ठेवली जात आहे. ट्राफिकच्या दृष्टीने व्यस्त असलेले ट्रॅफिक जंक्शन, गर्दीची असलेली ठिकाणं, उद्यानं, खेळाची मैदानं, मॉल्स व इतर महत्त्वाच्या ठिकाणी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे हे स्थानिक पोलीस ठाण्याशी लिंक असून, इथूनच यावर नजर ठेवली जाते. याबरोबरच निघणारे मोर्चे, आंदोलनं यावर नजर ठेवण्यासाठी पोलीस नियंत्रण कक्षसुद्धा सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवून आहेत .
हेही वाचा - महाराष्ट्रातील गुंतवणूक उत्तर प्रदेशात नेण्याचा भाजपाचा कुटील डाव - सचिन सावंत
डिजिटल बारकोडने घातली जाते पोलीस गस्त
डिजिटल माध्यमांवर मुंबई पोलीस आली असून ट्विटर, फेसबुकसारख्या सोशल माध्यमांवर तक्रार केल्यास किंवा एखाद्या समस्येची माहिती दिल्यास पोलिसांकडून त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येत आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात असलेल्या 60 अशा पॉइंटवर जे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे मानले जातात. प्रत्येक पोलीस ठाण्यांमधील 60 ठिकाणच्या पॉईंटवर डिजिटल बारकोड लावण्यात आलेले असून, या परिसरात गस्त घालणाऱ्या पोलिसांना वेळोवेळी या बारकोडवर मोबाईल स्कॅन करून त्यांनी गस्त घातल्याचा पुरावा त्यांच्या खात्याला द्यावा लागत आहे. मुंबई पोलीस खात्यात 3 प्रकारे गस्त घातली जाते. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अ वर्गवारी असलेल्या परिसरामध्ये प्रत्येक दोन तासानंतर पोलिसांची गस्त घातली जाते व ब वर्गीकरण असलेल्या परिसरामध्ये दिवसातून एकदा पोलीस गस्त घातली जाते. तर क वर्ग असलेल्या परिसरामध्ये आठवड्यातून एकदा पोलीस गस्त घालत आहेत.
डिजिटल होणे ही काळाची गरज
मुंबई पोलीस खात्यातील माजी ज्येष्ठ पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांच्या म्हणण्यानुसार, पोलीस खात्यात डिजिटलायझेशन मोठ्या प्रमाणावर करण्यात आले आहे. याचा फायदा पोलीस तपास यंत्रणा, कायदा सुव्यवस्था राखणे व जनतेशी डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी मुंबई पोलिसांकडून वापर केला जात आहे. ईमेल किंवा ऑनलाइन तक्रार सध्या मुंबई पोलीस खात्यात घेतली जात असून, त्याची तात्काळ नोंद घेऊन कारवाईसुद्धा केली जात आहे. जसे जग डिजिटलच्या युगात आणखी पुढे जात आहे त्याचप्रकारे मुंबई पोलीस डिजिटलच्या माध्यमातून उत्तम सेवा देत असल्याचे धनराज वंजारी यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - बॉलिवूडला साद घालण्यासाठी योगी आदित्यनाथ मुंबईत येणार; उद्योजकांशीही करणार चर्चा