मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मेपर्यंत भोंगे काढावे अन्यथा 4 मे रोजी मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता चारकोप आणि कांदिवली परिसरामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा वाजवली ( MNS Hanuman Chalisa Row ) आहे. त्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ( Mumbai Police Filed Case Mns Activist ) आहे.
राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मुंबई पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात मशिदीसमोर बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यातच आता चारकोप आणि कांदिवली परिसरामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा वाजवली होती. त्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांना 1200 रुपयांचा दंड भरल्यानंतर सोडून देण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था प्रमुख विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे.
135 मशिंदीकडून उल्लंघन - मुंबईमध्ये एकूण मशिदी 1140 आहे. त्यापैकी मुंबई पोलिसांनी 930 मशिदींना भोंगे लावण्याची परवानगी दिली आहे. मशिदींवर भोंगे लावण्यासाठी परवानगी मागणारे अर्ज प्राप्त झाले होते. मात्र, सायलेंट झोनमध्ये असलेल्या मशिदींवर भोंगे लावण्यास मुंबई पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. मुंबईतील 1140 मशिदींपैकी 135 मशिदींकडून आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे उल्लंघन करण्यात आले आहे. मुंबईतील 135 मशिदींवर आज पहाटे 6 वाजण्यापूर्वीच भोंगे वाजल्याचे पोलिसांना दिसून आले आहे. त्यामुळे या मशिदींवरील संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे गृह विभागाकडून सांगण्यात आले आहे
भोंगा लावण्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक - पोलिसांनी मुंबईतील धार्मिक स्थळासंदर्भात माहिती घेण्यात आली आहे. त्यानुसार मुंबईत 2400 मंदिर असल्याची नोंद पोलिसांकडे प्राप्त झाली आहे. त्यावेळी केवळ 24 मंदिरांनी भोंगा लावण्याची परवानगी मागितली आहे. आज ( 4 मे ) झालेल्या बैठकीत सर्व धार्मिक ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले की, कोणत्याही कार्यक्रमाकरिता भोंगा लावण्याकरिता परवानगी घेणे बंधनकारक आहे. सर्व मंदिरातील पदाधिकारी परवानगीकरिता अर्ज देखील करणार असल्याचे झालेल्या बैठकीमध्ये आश्वासन देण्यात आले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.