मुंबई - कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी प्रशासकीय स्तरावर वेगवेगळ्या उपायोजना राबविल्या जात आहेत. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे उत्तर मुंबईमधील मालाड येथील मुंबई महापालिकेच्या पी वॉर्ड हद्दीतील कोरोना पॉझीटिव्ह म्हणून रिपोर्ट आलेल्या ७० रुग्णांचा शोध गेल्या काही दिवसांपासून लागत नाही. अशा ७० बेपत्ता रुग्णांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांची मदत घेतली जात आहे. मुंबई पोलीस दलाचे प्रवक्ते प्रणय अशोक यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे. मुंबई महापालिकेच्या पी वॉर्डच्या अधिकाऱ्यांसोबत संवाद साधून सध्या मुंबई पोलीस या ७० पॉझीटिव्ह रुग्णांचा शोध घेण्यासाठी पोलीस तांत्रिक तपास करत आहेत.
गेल्या ३ महिन्यात मुंबई महापालकेच्या पी वॉर्डात असलेल्या काही नागरिकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अशा रुग्णावर पालिकेकडून उपचार करण्यासाठी त्यांचा शोध घेतला जात होता. यातील काही रुग्णांचे पत्ते चुकीचे असून काही रुग्णांच्या घराला टाळे लावलेले पाहायला मिळाले आहे.
काही रुग्णांनी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझीटिव्ह आल्यानंतर त्यांचा मोबाईल फोन बंद करून ठेवल्याने अशा रुग्णांना शोधणे कठीण होऊन बसल्याने मुंबई महापालिकेने आता मुंबई पोलिसांकडे मदत मागितली आहे. कोरोना पॉझीटिव्ह आलेले काही रुग्ण बेपत्ता झाल्याने इतरांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. बेपत्ता असलेल्या रुग्णाच्या बाबतीत काय झाले आहे, यातील किती जण शहराबाहेर गेले आहेत, किंवा किती जणांचा मृत्यू झाला, याचा शोध आता मुंबई पोलिसांच्या मदतीने घेतला जाणार आहे.