मुंबई - बृहन्मुंबईतील पोलिसांसाठी दोन वर्षांपूर्वी आठ तास ड्युटीचे अध्यादेश काढण्यात आले होते. सध्या हे अध्यादेश बासनात गुंडाळले गेले आहेत. यामुळे पोलिसांना 12 ते 14 तास काम करावे लागत आहे. या अतिरिक्त कामाचा पोलिसांच्या कार्यक्षमतेने परिणाम होत आहे. त्यामुळे राज्य शासनाने या संदर्भात निर्णय घेऊन, आठ तासांची ड्युटी करावी, अशी मागणी पोलिसांकडून होत आहे.
शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या डोक्यावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने पाच दिवसांचा आठवडा केला. मात्र यातून अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या पोलीस, आरोग्यसेवा आणि अग्निशामक दलाला वगळण्यात आले आहे. मात्र आता पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी त्यांच्या देखील कमाच्या तासांमध्ये घट करावी अशी मागणी होत आहे.
शारीरिक, मानसिक आरोग्यवर परिणाम
पोलिसांकडून नागरिकांना व्यवस्थित वागणूक मिळत नाही. पैसे खातात, व्यवस्थित तपास करत नाहीत, असा पोलिसांवर ठपका ठेवला जातो. मात्र पोलिसांवरील कामांच्या ताणाबद्दल कोणीच बोलायला तयार नसते. बऱ्याच वेळा पोलिसांना हक्काची सुटीही मिळत नाही. अनेकदा सलग सोळा तासापर्यंत काम करावे लागते. कोणताही सण उत्सव, निवडणूक, मोठ्या नेत्यांचा वाढदिवस असला की पोलिसांना दोन - तीन दिवस घरी जाता येत नाही. अनेकदा कुटुंबासोबत सण देखील साजरे करता येत नाहीत. याचा शारीरिक, मानसिक आरोग्यवर आणि कामांवर परिणाम होतो.
8 तास ड्युटीचा प्रयोग
तत्कालीन पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्या पुढाकाराने ५ मे २०१६ रोजी आठ तास ड्युटीच्या प्रयोगाला देवनार पोलीस ठाण्यातून सुरुवात झाली. नेहमीच्या कामकाजापेक्षा अधिक महापालिका निवडणूक प्रक्रिया, मोठे सण, महापुरुषांची जयंती काळातही पोलिसांनी उपलब्ध मनुष्यबळाचे अचूक नियोजन करून, आठ तासांच्या तीन पाळ्यांमध्ये काम करून दाखवले होते. त्यानंतर ६४ पोलीस ठाण्यात हा प्रयोग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र पडसलगीकर निवृत्त झाल्यानंतर पुन्हा एकदा हा प्रयोग बारगळ्याचे चित्र आहे.
एक महिन्याच्या अतिरिक्त पगाराची मागणी
सुटया कमी मिळत असल्यामुळे केंद्रशासन इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी कर्मचाऱ्यांना १३ महिन्याचा पगार देण्यात येतो. हाच पॅटर्न आता केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना देखील लागू करण्यात यावा. इंटेलिजन्सच्या धर्तीवर पोलीस कर्मचाऱ्यांनाही एक महिन्याचा अतिरिक्त पगार द्यावा, अशी मागणी आता पोलिसांकडून जोर धरू लागली आहे.
पोलिसांची संख्या वाढवायला हवी
पोलिसांची आठ तास ड्युटी लावने हे कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्यामुळे शक्य होत नाही. राज्यात पोलिसांच्या डयुटीचे तास कमी करायचे असल्यास पोलीस दलात मनुष्यबळ वाढवणे गरजेचे आहे. तसेच पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची सुयोग्य बांधणी करावी लागेल. वेगळं तंत्र यासाठी आत्मसात करणे अपेक्षित आहे, असे मत माजी ज्येष्ठ पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा - नागपुरात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई, ६० ठिकाणी बंदोबस्त