मुंबई - कोरोनाचा उद्रेक सुरू असतानाही विनाकारण फिरत असलेल्यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी दम भरला आहे. चांगल्या शब्दाने सांगून नाही समजले तर वेगळ्या पद्धतीने आम्हला समजावे लागेल. तशी वेळ येऊ देऊ नका, असे बोलून मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गर्दी बहाद्दर नागरिकांना सूचक इशारा दिला आहे.
महाराष्ट्रात 15 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. मात्र मुंबईतील रस्त्यावरची गर्दी कमी होण्याचे नाव घेत नाही. रेल्वेमध्येही गर्दी होत आहे. त्याचे कारण शोधले असता मागील लॉकडाऊनमध्ये सर्वच बंद होते. मात्र, या वेळेच्या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा सोबतच अनेक इतर सेवांनाही सूट देण्यात आली आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात वर्दळ दिसत असल्याचे मत मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी व्यक्त केले.
हेही वाचा-झालंय उलटं.. अकोल्यात ऑक्सिजनच्या रिकाम्या सिलेंडरचा तुटवडा; ऑक्सिजन भरायचे कशात हाच प्रश्न
गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ-
गर्दीच्या ठिकाणी सकाळ आणि संध्याकाळी सगळ्या डीसीपीकडून फोटो मागविले जात आहेत. जर जास्त गर्दी दिसून आली तर पोलीस बंदोबस्त वाढविला जात आहे. पोलिसांना सबुरीने वागण्याचा सल्ला दिला आहे. चांगल्या शब्दाने सांगून नाही समजले तर वेगळ्या पद्धतीने समजावे लागेल, असा इशारा पोलीस आयुक्त नगराळे यांनी दिला.
मुंबई पोलीस दलात लसीकरण प्रक्रियेला वेग -
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दुसरीकडे लसीकरण प्रक्रिया वेगाने सुरू आहे. देशात महाराष्ट्र लसीकरण प्रक्रियेत क्रमांक एकवर आहे. वाढणारी रुग्ण संख्या जरी चिंतेचा विषय असेल तरी लसीकरण प्रक्रिया ही समाधानाची बाजू म्हणावी लागेल. राज्यात मुंबईत रुग्ण संख्या सर्वाधिक सापडत आहे. सरासरी मुंबईत दिवसाला आठ ते नऊ हजार रुग्ण सापडत आहेत. डॉक्टर आरोग्य कर्मचारी त्याचबरोबर पोलीस या कोरोनाच्या युद्धात सर्वात पुढे येऊन लढत आहेत. मुंबई पोलीस दलात लसीकरण प्रक्रियेला वेग आला आहे.
हेही वाचा-जिथं लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे तिथं राजकरण नको, धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना टोला
इतक्या टक्के पोलिसांचे लसीकरण पूर्ण
लशीचे दोन डोस लाभार्थ्यांना दिले जातात पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस दिला जातो. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिस दलात 70 टक्के पोलिसांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर 30 टक्के पोलिसांचा पहिला डोस बाकी आहे. त्याचप्रकारे 40 टक्के पोलिसांनी दुसरा डोस घेतला आहे. 60 टक्के पोलिस कर्मचाऱ्यांचा दुसरा डोस घेणे बाकी आहे.
55 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पोलिस कर्मचाऱ्यांना फिल्ड ड्युटी नाही
वर्ष 2020 मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत 8 हजारांपेक्षा जास्त पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. तर 102 पोलीस कर्मचाऱ्यांना या धोरणाच्या काळात आपले प्राण गमवावे लागले आहेत. मागच्या लाटेत 55 वयांपेक्षा जास्त वय असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना फिल्ड ड्युटी देण्यात आली नव्हती. त्यांना सुट्टी देण्यात आली होती. मात्र, या दुसऱ्या लाटेत 55 वय असणाऱ्या किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना फिल्डवर ड्युटी न देता टेबल ड्युटी करण्याची सूचना पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केली आहे.