मुंबई - अभिनेता सुशांत सिंह रजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडचं ड्रग्स कनेक्शन समोर आलं होतं. या प्रकरणाचा तपास अजून मोठ्या सतर्कतेने सुरु आहे. नुकताच मुंबईमधील हॉटेलचा मालक कुणाल जानीला पोलिसांनी अटक केले. तो सुशांत सिंह रजपूतचा मित्र असून, ड्रग्स प्रकरणातील संशयित होता. NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी कुणालला अटक केली आहे.
गेल्यावर्षी जूनमध्ये बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह रजपूतने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तेव्हा बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शनसुद्धा उघड झालं होतं. यामध्ये अनेक कलाकारांची चौकशी करण्यात आली होती. तसेच काहींना अटकदेखील झाली होती.
कुणालची केली 6 तास चौकशी
यात अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावाचाही समावेश होता. या प्रकरणामध्ये एका आलिशान हॉटेलचा मालक आणि सुशांत सिंह रजपूतचा मित्र कुणाल जानीचीसुद्धा चौकशी झाली होती. यावेळी NCB ला कुणालविरुध्द काही पुरावे हाती लागले होते. रिया चक्रवर्ती असलेल्या व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये तोसुध्दा होता. या ग्रुपमध्ये लोक ड्रग्सबद्दल बोलत होते. ईडीने कुणालची तब्बल ६ तास चौकशी केली होती. कुणाल या प्रकरणानंतर फरार झाला होता. मात्र आज अखेर त्याला अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा - गृहमंत्र्यांची मुंबई आणि ठाणे पोलीस आयुक्तांसोबत बैठक; परमबीर सिंहांना शोधण्याचे आदेश