मुंबई - टीव्ही मालिकेतील नृत्यदिग्दर्शकावर अल्पवयीन सतरा वर्षीय मॉडलने लैंगिक अत्याचाराचा आरोप लावला होता. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी 51 वर्षीय आरोपीला अटक केली होती. या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयातील पॉक्सो कोर्टाने आरोपीला 3 वर्ष जेलमध्ये राहिल्यानंतर आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे.
घटनेदिवशी पीडिता आनंदी मूडमध्ये कशी - न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की ज्यादिवशी घटना घडली त्यादिवशी संध्याकाळी आपल्या घरी फोटो काढताना ती आनंदी मूडमध्ये दिसत होती. कोर्टाने नमूद केले की सदर फोटो पाहिल्यानंतर असे दिसते की पीडिता आनंदी मूडमध्ये दिसत आहे. तिने फोटोशूटसाठी पोज दिली आहे. जर कथित घटना त्या दिवशी दुपारी घडली असती तर ती संध्याकाळी आनंदी वाटली नसती. म्हणूनच ही घटना घडणे संशयास्पद आहे. 16 ऑगस्ट 2017 रोजी काढलेला फोटो आरोपीच्या वकिलाने कोर्टात हजर केला होता. पीडितेला कोर्टात विचारण्यात आले की फोटो त्या दिवशी काढलेला आहे का, तेव्हा तिने योग्य उत्तर देण्याचे टाळले. असे विशेष न्यायाधीश एस. एम. टाकळीकर यांनी निकालात नमूद केले आहे.
आरोपीचे आमिष - अल्पवयीन तक्रारदार हा दिल्लीतील नृत्यदिग्दर्शकाचा शेजारी होता. 22 महिन्यांच्या विलंबाने दाखल केलेल्या तक्रारीत सांगितले होते की तिला शाळेपासूनच अभिनय आणि चित्रपटांमध्ये काम करण्याची आवड होता. नृत्यदिग्दर्शक जो नंतर आपल्या मुलीसह मुंबईला गेला होता आरोपीने तिच्या वडिलांना तिला मुंबईला पाठवण्यास सांगितले होते. त्यावेळी असे सांगण्यात आले होते की एका कंपनीमध्ये नवीन चांगले काम आणि प्रतिभा असलेल्या कलाकारांना शोधत आहे आणि त्यांना त्यांच्या नवीन प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी देखील देणार आहे.
फ्रॉड कंपनी - पश्चिम उपनगरात कुटुंबासह राहण्यासाठी ती मुंबईत आली आणि अशी कोणतीही कंपनी अस्तित्वात नसल्याचे तिला कळले. तिने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला. पहिल्या लैंगिक अत्याचाराच्या व्हिडिओसह तिला धमकावले ज्यामध्ये त्याने पाण्यात काहीतरी मिसळून तिला पिण्यास भाग पाडले होते.
आरोपीचा ठोस युक्तीवाद - आरोपी व्यक्तीने आपल्या बचावात न्यायालयात सांगितले होते की तिच्या कामासाठी तिला पैसे देण्यावरून त्याच्यात आणि पीडितेमध्ये वाद झाला होता. त्यामुळे त्याला खोट्या गोष्टीत गोवण्यात आले होते. तक्रार दाखल करण्यास उशीर झाल्यामुळे संशय निर्माण होतो असेही न्यायालयाने म्हटले आहे. आरोपीच्या वकिलाने न्यायालयाला दाखवले की कथित पहिल्या घटनेच्या 26 दिवसांनंतर ती दिल्लीतील तिच्या पालकांच्या घरी गेली होती. ज्यासाठी आरोपीने स्वतः आरक्षण केले होते. त्यानंतर ती 20 दिवस तिच्या पालकांसोबत राहिली आणि त्यांना घडलेल्या घटनेबद्दल काहीही सांगितले नाही असे न्यायालयाने नमूद केले. त्यानंतर ती मुंबईत आरोपींसोबत राहायला परतली आणि कथित घटना घडली असती तर ती परत आली नसती असेही न्यायालयाने नमूद केले आहे.
साक्ष विश्वासार्ह वाटत नाही - नवीन वर्ष 2018 साजरे करण्यासाठी ती आरोपी, त्याच्या मुली आणि एका मित्रासोबत जबलपूरला गेली होती. तिथे त्यांनी मजा केली असेही त्यात नमूद केले आहे. अशा परिस्थितीत तो तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करत होता, यावर विश्वास ठेवणे कठीण असल्याचे निकालात म्हटले आहे. त्यात म्हटले आहे की पीडितेची साक्ष विश्वासार्ह वाटत नाही.