मुंबई - कोहिनूर मिल प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) आज चौकशी करण्यात आली. तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर राज ठाकरे ईडी कार्यालयाच्या बाहेर आले आहेत. ईडीच्या कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कार्यालयाबाहेर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि पुत्र अमित ठाकरे उपस्थित होते.
सकाळी साडेअकरा वाजल्यापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची ईडी कार्यालयात चौकशी सुरु होती. तब्बल ८ तासानंतर त्यांची चौकशी संपली असून, ते कार्यालयाबाहेर आले आहे. राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी बाहेरही पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. याविरोधात मनसेच्या कार्यकर्त्यांनी बंदची हाक दिली होती. मात्र राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना शांतता राखा, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस टाळा, सामान्य जनतेला त्रास होणार नाही याची काळजी घ्या, ईडीच्या कार्यालयाजवळ जमू नका, असं आवाहन केल्यानंतर हा बंद मागे घेण्यात आला.
सूत्रांच्या माहितीनुसार राज ठाकरे यांना विचारण्यात आलेले प्रश्न
1) कोहिनूर सिटीएनएल या कंपनीत तुमची भूमिका काय ?
2) या कंपनीत किती गुंतवणूक केली होती?
3) या कंपनीत आपला हिस्सा किती ?
4) कंपनीत गुंतवलेले पैसे राज ठाकरे यांनी कोठून आणले?
5) या कंपनीबाबत तुम्हाला काय काय माहिती आहे? तुम्ही कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ओळखता का?
6) कंपनीत तुम्ही किती शेअर विकले , त्याचे कारण काय? विक्रीनंतर तुम्हाला किती नफा किंवा तोटा झाला?
7) कंपनीला नुकसान झाले म्हणून तुम्ही बाहेर पडलात का ? कंपनीवरील कर्ज अचानक कसे वाढले?
8) मिळालेल्या पैशांचा कर भरण्यात आला आहे का?
राज ठाकरेंना तब्बल 8 तास वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्यास बराच वेळ देण्यात आला. कंपनीच्या आर्थिक व्यवहार, बँकिंग व्यवहाराबद्दल राज ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आले. मात्र, हे प्रकरण फारच जुने असल्याने याबद्दल आपणास पूर्ण माहिती नसल्याचे राज ठाकरेंनी सांगितल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान ईडीकडून गरज पडल्यास राज ठाकरे यांना पुन्हा चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे.
कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत मनसेप्रमुख राज ठाकरे हे आज सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीला सामोरे गेले. या कारवाईमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कृष्णकुंज परिसर आणि दक्षिण मुंबईत ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. तसेच ईडी कार्यालयाच्या परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करु नये, यासाठी मनसेच्या प्रमुख पदाधिकारी व मनसैनिकांना उपस्थित न राहण्यासाठी नोटीस बजाविल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज ईडी कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. मंगळवारी एका मनसे कार्यकर्त्याने आत्मदहन करून घेतले होते.
3:00 pm तब्बल साडेतीन उलटले तरिही चौकशी सुरूच
ईडीच्या मुख्यालयात मागील साडेतीन तासांपासून राज ठाकरे यांची चौकशी सुरू आहे. उन्मेश जोशी यांची चौकशी देखील साधारणतः आठ तास झाली होती. यामुळे राज ठाकरे यांची चौकशी अजून काही वेळ चालेल असा अंदाज वर्तवला जात आहे
2:00pm सरकारचे पितळ उघडे पडू नये म्हणून राज ठाकरेंना ईडीची नोटीस आल्याची घनंजय मुंडे यांची टिका
मागील तीन तासांपासून राज ठाकरे यांची चौकशी सुरू आहे. राज यांची चौकशी ही सरकारच्या अघोषीत आणीबाणीचा नमुना आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परभणी येथील जिंतूरमध्ये केली आहे.
01:30 pm मागील दोन तासांपासून राज ठाकरेंची चौकशी सुरू
राज ठाकरे यांची मागील दोन तासांपासून ईडी मुख्यालयात चौकशी सुरू आहे.
11:50 राज ठाकरे ईडी मुख्यालयात तर कुटुंबीय ग्रँड हॉटेलमध्ये
राज ठाकरे हे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले आहेत तर त्यांच्या सोबत आलेल्या पत्नी शर्मिला ठाकरे, पूत्र अमित ठाकरे व संपूर्ण ठाकरे कुटूंबीय हे ग्रँड हॉटेलमध्ये थांबले आहेत.
11:30 am मनसे अध्यक्ष राज ठाकरे ईडी कार्यालयात दाखल
राज ठाकरे हे अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यांच्या समवेत त्यांचे कुटूंबीय आहेत. तसेच पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी आहे.
10:30 am राज ठाकरे ईडी कार्यालयाकडे रवाना
लँड क्रूझर या त्यांच्या नऊ गाडी नंबर असणाऱ्या गाडीमध्ये मागच्या सीटवर राज ठाकरे बसले आहेत. त्यांच्या मागे ईनोवा गाडी सुद्धा नऊ नंबरची असून त्यामध्ये अमित ठाकरे अमित ठाकरे, त्यांच्या पत्नी आणि शर्मिला ठाकरे बसल्या होत्या
राज यांच्या मातोश्री झाल्या भावुक
राज ठाकरेंना त्यांच्या मातोश्री दरवाजापर्यंत सोडण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसत होते.
राज ठाकरे ईडी कार्यालयाकडे रवाना झाले असून त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे, राज ठाकरे यांची बहीण त्यांची मुलगी, सुन असा एकूण सर्व परिवार ईडी मुख्यालयाकडे रवाना झाले आहेत.
10:20 am मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात
सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडून अविनाश जाधव यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
10:10 am राज ठाकरे थोड्याच वेळात ईडी मुख्यालयात जाणार
राज ठाकरे यांच्या सोबत अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे जाणार, अमित ठाकरेंची पत्नी मितालीही ईडी कार्यालयात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
- मुंबईत काही भागात जमावबंदी लागू
मुंबईच्या दादर, आझाद मैदान, मरिन ड्राईव्ह आणि एमआरए मार्ग पोलिस स्टेशन अंतर्गत जमावबंदी कलम 144 लागू, चारपेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास मनाई.
- मनसे नेते संतोष धुरी पोलिसांच्या ताब्यात
संदीप देशपांडे, रवी मोरे यांच्या नंतर संतोष धुरी यांनाही पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.
- ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे पोलीसांच्या ताब्यात
प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून पोलिसांनी मोरे यांना घेतले ताब्यात.
- ईडी कार्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काही वेळातच ईडी कार्यालयात कोहिनूर मिल प्रकरणी चौकशीसाठी पोहचणार असून, मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त केला आहे.
- 8:00 am - पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड, संदिप देशपांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
संदीप देशपांडे यांनी सरकार आणि ईडीचा निषेध म्हणून काळ्या रंगाचे 'EDiot Hitler' लिहिलेले टी-शर्ट घातले होते
- कोहिनुर स्केअर, ईडी कार्यालय, कृष्णकुंज, शिवसेना भवनाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
हेही वाचा...