मुंबई - येथे मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून येत आहेत. त्यातच मुंबई महापालिकेने जे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत मात्र त्यांच्यामध्ये लक्षणे नाहीत अशांची टेस्ट करू नये, असा निर्णय घेतला आहे. याचे मुंबईमधील डॉक्टरांनी स्वागत केले आहे. हा निर्णय योग्य असल्याचे मेडस्केप इंडियाच्या अध्यक्षा आणि रेडिओलॉजिस्ट डॉ. सुनिता दुबे यांनी म्हटले आहे.
मुंबईमध्ये 2100 हुन अधिक रुग्ण कोरोनाचे पॉझिटिव्ह आहेत. 123 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये रोज नव्याने रुग्ण आढळून येत आहेत. त्यांच्या सहवासात आलेल्या लोकांच्या कोरोना टेस्ट केल्या जायच्या. मात्र, यात आता बदल करण्यात आला आहे. रुग्ण पॉझिटिव्ह असेल आणि त्यांच्यामध्ये लक्षणे नसतील तर त्याची चाचणी करू नये, असा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्याचे डॉक्टरांच्या मेडस्केप इंडिया या संस्थेने स्वागत केले आहे.
रॅपिड टेस्ट शक्य नाही ती खर्चिक आहे. जास्त लोकसंख्या असल्याने तिथपर्यंत पोहचणे शक्य नाही. देशात इन्फ्रास्ट्रक्चर आणि डॉक्टर कमी आहेत. पीसीआर टेस्टच्या माध्यमातूनच कोव्हिड झाल्याचे सुरुवातीलाच समजू शकते. पीसीआर टेस्टद्वारेच कोव्हिडची चाचणी योग्य प्रकारे होते. यामुळे सरकारला आपण साथ दिली पाहिजे. कोव्हिडपासून वाचण्यासाठी क्वारेंटाईन हेच एक माध्यम आहे, असे डॉ. सुनिता दुबे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - मुंबईत कोरोनाचे 87 नवे रुग्ण तर 4 जणांचा मृत्यू ; रुग्णांची एकूण संख्या 2509
रॅपिड टेस्ट या फक्त कोव्हिडची लक्षणे असलेल्या लोकांच्याच केल्या पाहिजेत. ज्यांना लक्षणे नाहीत त्यांच्या चाचण्या करण्याचा आग्रह धरणे योग्य नाही. अशा चाचण्या करताना लोकांना घरा बाहेर पडावे लागेल. बाहेर ते इतरांच्या संपर्कात येऊ शकतात. यामुळे नागरिकांनी घरीच राहणे योग्य आहे, असा सल्लाही त्यांनी दिला. एखाद्याचे तातडीने ऑपरेशन करण्याची वेळ आली तर आधी कोव्हिडची टेस्ट करून घ्यावी आणि नंतरच ऑपरेशन करावे, असे आवाहनही दुबे यांनी केले.