मुंबई - मुंबई महानगरपालिकेचे 227 प्रभाग होते. लोकसंख्येत वाढ झाल्याने राज्य सरकारने 9 प्रभागांची वाढ करून 236 प्रभाग केले आहेत. प्रभाग रचना मंजूर झाल्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने निवडणूक आयोगाने ओबीसी वगळता निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आज 31 मे ला सकाळी 11 वाजता बांद्रा येथील रंगशारदा सभागृहात अनुसूचित जातीच्या 15, अनुसूचित जमातीच्या 2 आणि 50 टक्के म्हणजेच 118 महिला आरक्षित प्रभागांची लॉटरी काढली जाणार आहे.
अशी सोडत काढली जाणार - राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी, पालिका आयुक्त व प्रशासक इकबाल सिंग चहल यांच्या उपस्थितीत महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या हस्ते आरक्षण लॉटरी काढली जाणार आहे. सुरुवातीला अनुसूचित जातीच्या 15, अनुसुचित जमातीच्या 2 प्रभागांची सोडत काढली जाणार आहे. त्यानंतर त्यामधील महिला आरक्षित प्रभागांची सोडत काढली जाईल. शेवटी उर्वरित प्रभागांमधून 109 महिला आरक्षित प्रभागांची सोडत काढली जाणार आहे. आरक्षित प्रभागांच्या सोडतीनंतर त्यावर 6 जूनपर्यंत सूचना व हरकती मागवण्यात येणार आहेत. 13 जूनला अंतिम आरक्षण सोडत राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे.
इच्छुक उमेदवारांचे लक्ष - आज प्रभाग आरक्षण सोडतीनंतर कोणत्या प्रभागातून कोणता उमेदवार द्यायचा याची चाचपणी राजकीय पक्षांकडून सुरू केली जाईल. त्याचप्रमाणे इच्छुक उमेदवारही निवडणुकीच्या कामाला लागणार आहे. ही आरक्षण सोडत प्रभाग आरक्षित झाल्याने अनेकांना पुढील पाच वर्षे नगरसेवक पदापासून लांब ठेवणार आहे. यामुळे या आरक्षण सोडतीकडे राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - BMC Election 2022 : महापालिका आरक्षणाची अशी राबवली जाणार लॉटरी प्रक्रिया; वाचा सविस्तर