मुंबई - खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी खार येथील घरात बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी महापालिकेने नोटीस ( BMC Notice To Rana Home In Khar ) बजावली आहे. या नोटीसीला राणा यांनी उत्तर दिले आहे. मात्र राणा यांनी घराबाबत दिलेले सर्व पुरावे महापालिकेला अमान्य आहेत. याला न्यायालयात आव्हान दिले, असता राणा यांना बांधकाम नियमित करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला आहे. त्यानंतर आता महापालिकेने या इमारतीत राहणाऱ्या सर्वच रहिवाशांना नोटीस बजावली आहे.
महापालिकेची नोटीस - खार पश्चिम, १४ व्या रस्त्यावर 'लाव्ही' इमारतीत राणा दाम्पत्य यांचे घर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालीसा वाचण्यास जाण्यासाठी हे दांपत्य मुंबईत आले तेव्हा याच इमारतीत उतरले होते. या इमारतीत तसेच काही घरांमध्ये मंजूर आराखड्याव्यतिरीक्त अधिक बांधकाम करण्यात आल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. महापालिका नियमांचे उल्लंघन केल्याच्या तक्रारीवरुन मुंबई महापालिकेने तपासणीसाठी कलम ४८८ नुसार नोटीस पाठवली होती. राणा हे तुरुंगात असल्याने महापालिकेच्या पथकाने त्यांच्या घरावर नोटीस ( BMC Notice To Rana Home In Khar ) बजावली होती. राणा यांच्या घरी पालिकेचे पथक दोन वेळा जाऊन आले होते. मात्र ते तुरुंगात असल्याने महापालिकेच्या पथकाला त्यांच्या घरात जाता आले नव्हते.
नव्याने नोटीस - ९ मे ला राणा दांपत्य दिल्लीला रवाना होण्याच्या आधी पालिकेचे पथक त्यांच्या घरी पोहोचले. त्यांनी घरात झालेल्या बांधकामाची माहिती घेतली. त्यात काही बेकायदेशीर बांधकाम झाल्याचे आढळून आले आहे. यामुळे राणा दाम्पत्यांला महापालिकेने नोटीस बजावली. त्याला उत्तर देताना बेकायदेशीर बांधकाम झाले नसल्याचे राणा यांनी महापालिकेला कळविले आहे. राणा यांच्या उत्तराने पालिकेचे समाधान झाले नसल्याने नव्याने नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील १५ दिवसात बांधकाम पाडा नाहीतर आम्ही पाडू अशी नोटीस महापालिकेने राणा दाम्पत्यांना दिली आहे. त्याला राणा यांनी न्यायालयात आव्हान दिले. त्यानंतर दिंडोशी न्यायालयाने राणा यांना दिलासा दिला आहे. बीएमसीची नोटीस ( BMC Notice To Rana Home In Khar ) बजावल्यानंतर आता राणा दाम्पत्य आपले बेकायदा बांधकाम लवकरच नियमित करणार आहेत. दिंडोशी न्यायालयाने त्यांना एक महिन्याची मुदत दिली आहे.
इमारतीला नोटीस - राणा दाम्पत्याला महापालिकेने नोटीस दिल्यानंतर न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे. त्यानंतर महापालिकेने याच इमारतीमध्ये राहणाऱ्या 8 रहिवाशांना नोटीस बजावली आहे. येत्या 30 मे ला घरात येवून पाहणी करून छायाचित्र घेवू. त्यावेळी आपली कागदपत्रे आणि पुरावे उपलब्ध करून द्यावेत असे नोटीसीत बजावण्यात आले आहे. यामुळे आता महापालिकेने राणा दांपत्य राहत असलेल्या इमारतीकडे आपला मोर्चा वळवला आहे.
हनुमान चालीसा प्रकरण - मुख्यमंत्र्यांच्या खासगी निवासस्थान असलेल्या "मातोश्री" या बंगल्यावर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान राणा दाम्पत्याने दिले होते. त्यानंतर मुंबईत दोन दिवस वातावरण तापले होते. या प्रकरणी राणा दाम्पत्यांला पोलिसांनी अटक केल्यानंतर ते बारा दिवस तुरुंगात होते. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला आहे. जमीन मिळाल्यावर राणा दांपत्यांनी माध्यमांना बाईट दिली आहे. विशेष म्हणजे कोर्टाने त्यांना मीडियाशी बोलू नये, अशी अट घातली होती. कोर्टाने दिलेले अट पाळली नसल्याने राज्य सरकारने राणा दाम्पत्याचा जमीन रद्द करण्याची मागणी कोर्टाकडे केली आहे. त्यानंतर राणा यांना नोटीस पाठवून त्यांचे यावर म्हणणे मांडण्याचे आदेश देण्यात आले होते.