मुंबई - मुंबई महानगरपालिकेची मुदत येत्या ८ मार्चला संपत आहे. सध्या प्रभाग पुर्नरचनेवर सूचना व हरकती मागवण्यात येत आहेत. यामुळे त्याआधी २०२२ च्या सार्वत्रिक निवडणुका होणे शक्य नाही. निवडणुका एप्रिल महिन्याच्या मध्यात होण्याची शक्यता आहे. यामुळे पालिकेची मुदत संपल्यावर प्रशासक नेमला जाऊ शकतो किंवा पालिकेला मुदतवाढ दिली जाऊन शकते. याबाबत जो काही निर्णय आहे तो राज्य सरकारकडून घेतला जाऊ शकतो, अशी माहिती पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामुळे पालिकेवर प्रशासक नेमला जाणार कि मुदतवाढ मिळणार हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.
- प्रशासक कि मुदतवाढ
मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक २२ फेब्रुवारी २०१७ रोजी झाली होती. तर महापौरांची ९ मार्च २०१७ ला निवड झाली होती. यामुळे महापालिकेचा ५ वर्षाचा कालावधी ८ मार्च २०२२ रोजी संपत आहे. निवडून आलेल्या सदस्यांचा कालावधी संपत असल्याने त्यानंतर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेवर प्रशासक नियुक्त करणे अपेक्षित आहे. महापालिकेची निवडणूक मार्च ऐवजी एप्रिल महिन्यात होणार आहे. यामुळे एका महिन्यासाठी राज्य सरकार प्रशासक नियुक्त करेल, अशी शक्यता कमी आहे. महापालिकेवर प्रशासक नियुक्त करायचा कि आताच्या महापालिकेला मुदतवाढ द्यायचा हा निर्णय राज्य सरकार घेईल,, असे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
- प्रशासकाच्या नियुक्तीची शक्यता कमी!
मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. तसेच राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत तसेच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. महापालिकेची निवडणूक मार्च ऐवजी एप्रिल महिन्यात होणार आहे. यामुळे एका महिन्यासाठी राज्य सरकार महापालिकेवर प्रशासक नियुक्त करेल, अशी शक्यता कमी आहे. महापालिकेच्या इतिहासात याआधी एकदाच प्रशासक नियुक्त केला आहे.
- 'बूथ आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढणार'
२०१७ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत ८५०० बूथ होते. एका बुथमध्ये १२०० मतदार होते. सध्या कोरोनाचा प्रसार असल्याने तो वाढू नये म्हणून येत्या २०२२ च्या निवडणुकीत ११ हजाराहून अधिक बूथ असतील. एका बुथमध्ये ८०० मतदार मतदान करतील. एका बुथवर ५ कर्मचारी लागतात. बुथची संख्या ११ हजाराहून अधिक असणार आहे. यामुळे येत्या निवडणुकीत ६० हजार कर्मचारी लागणार आहे. दिव्यांग मतदारांना तळ मजल्यावर मतदान केंद्र असणार आहे. मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी रॅम्प असेल. ज्या ठिकाणी लिफ्टची सोया आहे,, अशा ठिकाणी दिव्यांगांसाठी पहिल्या मजल्यावर मतदान केंद्र असेल. कोरोनाच्या प्रसारामुळे केंद्रावर सॅनिटायझर असेल मतदारांना मास्क घालणे सक्तीचे असेल असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
- घरबसल्या मतमोजणी पाहता येणार
मतमोजणीवेळी राजकीय कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. ही गर्दी होऊ नये म्हणून केंद्रामधील मतमोजणी लाइव्ह दाखवण्याचा प्रयत्न आहे. यामुळे घरबसल्या मतमोजणी पाहता येणार आहे. तसेच निकालाची प्रतही ऑनलाइन उपलबध केली जाणार आहे. यामुळे मतमोजणी केंद्राबाहेरील गर्दी कमी होईल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा - Maharashtra Corona New Guidelines : राज्यातील कोरोना निर्बंधात शिथिलता; 'ही' ठिकाणे 50 % क्षमतेने सुरु होणार