मुंबई - समुद्राला आज दुपारी मोठी भरती होती. या भरतीदरम्यान समुद्राच्या लाटांबरोबर मुंबईच्या समुद्राकिनाऱ्यावर आलेला तब्बल 239 मेट्रिक टन कचरा पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उचलून समुद्र किनारा साफ केला आहे.
मुंबईत मरिन लाईन्स, गिरगाव, दादर, माहीम, वर्सोवा, गोराई आदी चौपाट्या आहेत. या चौपाट्यांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि नागरिक मौजमजा करायला जातात. त्यावेळी नागरिक समुद्रात मोठ्या प्रमाणात कचरा टाकतात. तसेच नाल्यांमधून टाकण्यात आलेला कचरा समुद्रात जातो. हा कचरा समुद्रात असतो, मात्र भरतीच्या वेळी समुद्र हा कचरा किनाऱ्यावर टाकतो.
आज दुपारी समुद्राला 4.83 मीटरची भरती होती. नाल्यातून तसेच समुद्रात टाकण्यात आलेला कचरा भरतीदरम्यान समुद्राने किनाऱ्यावर टाकला. त्यात मरिन लाईन येथून 7 मॅट्रिक टन, गिरगांव चौपाटी येथून 12 मेट्रिक टन, दादर माहीम येथून 30 मेट्रिक टन, वर्सोवा जुहू येथून 178 मेट्रिक टन, गोराई येथून 12 मेट्रिक टन, असा एकूण 239 मेट्रिक टन कचरा पालिकेने उचलल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.