मुंबई - मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईमधून कोरोनाला हद्दपार करायचे असल्यास कोरोना चाचण्यांची संख्या वाढवावी लागेल, त्यामुळे चाचण्यांसाठी मुंबईकरांनी पुढे यावे, असे आवाहन पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी केले आहे.
मुंबईत गेल्या वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेकडून कोरोना चाचण्या आणि लसीकरण यावर भर देण्यात येत आहे. फेब्रुवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली. कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, महापालिकेकडून चाचण्यांचा देखील वेग वाढवण्यात आला. फेब्रुवारी महिन्यात दररोज सरासरी 24 हजारांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात येत होत्या. तर एप्रिल महिन्यात चाचण्यांचे प्रमाण वाढवून दिवसाला सरासरी 44 हजार एवढे करण्यात आले. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोना चाचण्याचे प्रमाण घटले असून, ते आता दिवसाकाठी २८ हजारांवर आले आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर आयुक्तांकडून कोरोना चाचण्या करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
कोरोना चाचणी आणि लसीकरणावर भर
कोरोनाला रोखण्यासाठी कोरोना लसीकरण आणि कोरोना टेस्टिंग हे दोनच उपाय प्रभावी आहेत. त्यामुळे महापालिकेकडून सध्या लसीकरण आणि कोरोना टेस्टिंगवर भर देण्यात येत आहे. दिवसाला कमीत कमी 40 हजार कोरोना चाचण्या करण्याचे उद्दिष्ठ आहे. त्यामुळे मुंबईकरांनी कोरोना चाचण्यासाठी तसेच लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी केले आहे.
सुट्यामुळे कोरोना चाचण्यांचा वेग मंदावला
गेल्या रविवारी २८ हजार ६३६ चाचण्या करण्यात आल्या होत्या. शनिवार आणि रविवारी सुटी असल्याने चाचण्यांमध्ये घट झाल्याचे दिसून आले. आतापर्यंत 54 लाख 90 हजार 241 काेराेना चाचण्या झाल्याची माहिती पालिकेच्या आराेग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
हेही वाचा - 'शिरच्छेदाची धमकी कुणी दिली हे पुनावालांनी सांगावे' पाहा नाना पटोलेंची संपूर्ण पत्रकार परिषद