मुंबई - मुंबई महापालिकेच्या लसीच्या टेंडरबाबत एका वृत्तवाहिनीच्या बातमीवर सोशल मीडियावर आलेल्या कमेंटला महापौरांच्या मोबाईलवरून शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात आले.मात्र हे ट्विट व्हायरल होताच महापौरांनी ट्विट डिलीट केले आहे. यावरून आपला मोबाईल दुसऱ्याकडे देऊ नये याचा मी धडा घेतल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
महापौरांचे उत्तर व्हायरल -
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची एका वृत्तवाहिनेने मुलाखत घेतली होती. लसीच्या ग्लोबल टेंडरबाबत घेण्यात आलेली मुलाखत त्या वृत्तवाहिनिने सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली होती. त्यावर एकाने "ग्लोबल टेंडर कोणाला" असे कमेंट केले होते. त्यावर महापौरांच्या ट्विटर हँडलवरून "तुझ्या बापाला" असे कमेंट करण्यात आले होते. महापौरांच्या ट्विटरवरून असे उत्तर आल्याने ते मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. आपल्या ट्विटरवरून देण्यात आलेले उत्तर व्हायरल झाले आणि त्याची चर्चा होत असल्याचे लक्षात आल्यावर महापौरांनी हे ट्विट डिलीट केले आहे. याबाबत खुलासा करताना गुरुवारी बीकेसीमध्ये कार्यक्रम होता तेव्हा कार्यक्रमच्यावेळी माझा मोबाईल दुसऱ्याकडे होता. माझ्या मोबाईलला लॉक नसत कोणत्यातरी शिवसैनिकाने हा रिप्लाय दिला असावा. मी मोबाईल घेतला आणि ट्विट डिलीट केले. त्या मुलाला मी समज दिली आहे. यावरून आपला मोबाईल दुसऱ्याकडे देऊ नये, असा धडा घेतल्याचे महापौरांनी सांगितले.
म्युकरमायकोसिसची काळजी -
म्युकरमायकोसिसबाबत आपण लढाई लढत आहोत. म्युकरमायकोसिससाठी राज्य सरकार टास्क फोर्स तयार करत आहे. विषाणूची वाढ होत आहे आपल्या सवयी बदलल्या पाहिजेत. सर्व प्रकारची काळजी घेण गरजेचे आहे. पालिकेकडून सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे असे महापौरांनी सांगितले.
आरोप करत राहावे -
आरोप करणाऱ्यांनी करत राहावे त्यांचं ते काम आहे आम्ही सर्व शहानिशा करूनच लसीचे ग्लोबल टेंडर दिल जाईल. टेंडर देताना दलाल वगैरे काही नाही सर्व कागदपत्रे तपासून निर्णय घेतला जाईल असे महापौरांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना ऑगस्टच्या आधी लस -
परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लस दिली जाईल. ऑगस्टच्या अगोदर दोन्ही डोस त्यांना देण्याची प्रक्रिया पूर्ण करू असे महापौर म्हणाल्या. आता आपल्याकडे 87 हजार लसीचा साठा आलेला आहे. यामुळे आज बंद असलेले लसीकरण पुन्हा सुरू केले जाईल.