मुंबई - मुंबईच्या महापौरांनी ( Mumbai Mayor Kishori Pednekar ) गुजरात, अहमदाबाद येथील सायन्स सेंटरला भेट देऊन त्यामधील पेंग्विनची पाहणी केली. याबाबत भाजपकडून टीका केली जात आहे. या टिकेला उत्तर देताना चित्रा वाघ ( chitra wagh ) माझ्या सासू लागतात का? त्यांना विचारून मी कुठे जायचे का? असा प्रश्न विचारत त्यांचे गणित कच्चे, त्यांनी पालिकेच्या शाळेत शिक्षण घ्यावे, अशी टीका मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ( Mumbai Mayor Kishori Pednekar comment on chitra wagh ) यांनी केली.
हेही वाचा - Nitesh Rane Surrendered : नितेश राणे अखेर कणकवली न्यायालयासमोर शरण
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेच्या माध्यमातून शिवसेनेला फायदा होणार आहे. यावरून भाजपकडून शिवसेनेला लक्ष केले आहे. त्याला उत्तर देताना ज्यांनी जसे केले आहे, तसेच त्यांना दिसत असल्याची टीका महापौरांनी केली.
भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर -
भायखळा राणीबाग येथे 'व्हर्च्यूअली व्हाईल्ड' या सफरीच्या तिसऱ्या मालिकेचे अनावरण महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी महापौर बोलत होत्या. यावेळी बोलताना, मागच्या आठवड्यात मी, उपमहापौर व काही अधिकारी आपल्या खर्चाने गुजरातमध्ये उभारण्यात आलेले सायन्स पार्क बघायला गेलो. आम्ही आमच्या पैशांनी तिथे गेलो होतो. मुंबईत परतल्यावर शनिवार, रविवार काहीही बोलले नव्हते. मात्र, भाजपवाल्यानी एकापाठोपाठ उलट्या सुरू केल्या. चित्रा वाघ यांनी केलेल्या टीकेवर बोलताना चिवा ताईचे गणित कच्चे आहे. त्यांनी हवे तर पालिकेच्या शाळेत येऊन शिक्षण घ्यावे. त्यांना उपदेशाचे जे डोस द्यायचे ते द्यावेत, त्यासाठी त्यांना बोलावे लागते. तुम्हाला हे सर्व बोलण्यासाठीच पक्षात घेतले आहे. बाकी तुमचा काहीही उपयोग नाही, असा टोला महापौरांनी लगावला.
अतुल भातखळकर यांच्याबाबत बोलताना त्यांना उलट्या करायलाच पक्षात ठेवले आहे. ते तर सर्व सोडून बोलतात. भाजपचे नेते नेहमी कागदपत्रे फडकवतात. तुमच्याकडे खरंच काही पुरावे असतील तर, ते दाखवा, नक्की कारवाई करू. मात्र, उगाच आरोप करू नका, असे महापौर म्हणाल्या.
२५७ कोटींचे आफ्रिकन पेंग्विन पार्क -
मुंबईच्या राणीबागेत १७.५० कोटींमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे पेंग्विन पार्क उभे केले आहे. राणीबाग १८६५ पासून प्रगती करत आहे. राणी बागेत एकाच तिकीटात सगळेच बघता येते. मुंबईकरांसाठी ही परवडणारी पर्वणी आहे. गुजरात अहमदाबादमध्ये २५७ कोटी रुपये खर्च करून आफ्रिकन पेंग्विन पार्क उभे केले आहे. गुजरात आणि मुंबईच्या पार्कमध्ये फरक आहे. तिथले पार्क राज्य सरकारने केले. इथे महापालिका सगळे करत आहे. राणीबाग सुशोभीकरण 'व्हर्च्युअल व्हाईल्ड' टूरचा तिसरा टप्पा आज पाणथळ दिवसानिमीत्त अनावरण करण्यात आला आहे. मुंबई हे एकमेव शहर आहे जिथे पाणथळ जागांसाठी स्वतंत्र बजेट आहे, अशी माहिती महापौरांनी दिली.
मुंबईची तोडफोड केली होती का -
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेत बदल केली जात आहे. त्यासाठी सूचना व हरकती मागवण्यात आल्या आहेत. या प्रभाग रचनेतून सत्ताधारी शिवसेनेला फायदा होणार आहे, असा आरोप केला जात आहे. यावर बोलताना २०१७ च्या निवडणुकीआधी तुम्ही प्रभाग रचना बदलली. त्यावेळी मुंबईमधील सर्व प्रभागांच्या सीमांची तोडफोड केली होती का? असा प्रश्न विचारत ज्यांनी जसे केले तसेच त्यांना दिसते, असा टोला महापौरांनी लगावला.
मनसे बैठक -
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बैठक घेतली आहे. या बैठकीत त्यांनी निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. यावर बोलताना निवडणूक आव्हान घेऊनच करायची असते. त्यामुळे, प्रत्येक पक्ष त्याच्या परीने चालणार. त्यांची आव्हाने पेलवण्याची ताकद आमच्यात आहे, असे महापौरांनी म्हटले.
निवडणुकांवर लक्ष ठेवून अर्थसंकल्प सादर करत नाही -
काल केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला आहे. उद्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. याबाबत बोलताना आम्ही महापालिकेचा अर्थसंकल्प हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर करत नाही. तर, तो लोकाभिमुख सादर करतो, असा टोला महापौरांनी मोदी सरकार आणि भाजपला लगावला आहे.