मुंबई - मुंबईत रोज कुठे ना कुठे आगी लागत आहेत. अग्निशमन दलाकडून योग्य प्रकारे काम केले जात नसल्याने महापौर आज चांगल्याच संतापल्या. अग्निशमन दल योग्य प्रकारे काम करते का, अवैध सिलिंडरचा साठा तसेच ज्वलनशील पदार्थांचा साठा करून ठेवलेल्या ठिकाणांबाबत नागरिकांनी पुढे येऊन महापौर कार्यालयामध्ये तक्रारी द्याव्यात, असे आवाहन महापौरांनी केले आहे. त्याची दखल घेण्यासाठी महापौर कार्यालयात एक विशेष अधिकारी नियुक्त करणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. तसेच आगीबाबत येत्या दोन दिवसात बैठक बोलावली असल्याचे महापौरांनी सांगितले.
अधिकाऱ्यांना घेतले फैलावर -
मानखुर्द मंडाला येथे नुकतीच बेकायदेशीर गोदामाला आग लागली होती. याठिकाणी भंगाराच्या गोडाऊनमध्ये बेकायदेशीर ऑइलच्या पिंपांचा साठा करण्यात आला होता. ऑइल असल्याने ही आग पसरली. मानखुर्दमधील आग विझवण्यासाठी सुमारे २१ तासांचा कालावधी लागला होता. हा प्रकार ताजा असतानाच आज अंधेरी यारी रोड येथील सिलिंडरचा साठा असलेल्या गोडाऊनला आग लागली. या आगीच्या घटनास्थळाला महापौरांनी भेट दिली. या भेटीदरम्यान महापौरांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. रोज-रोज लागणाऱ्या आगीबाबत त्यांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना जाबही विचारला.
यावेळी पत्रकारांशी बोलताना, निवासी भागात सिलिंडरचा साठा करणे हे चुकीचे असून एका व्यक्तीच्या फायद्यासाठी अनेकांचा जीव धोक्यात घालणे ही गंभीर बाब असल्याचे महापौर म्हणाल्या. आगी लागू नयेत म्हणून काळजी घेतली जाते का, याची माहिती घेण्यासाठी पालिकेच्या वॉर्डमधील अधिकारी आणि अग्निसुरक्षा पालन अधिकारी यांनी भेट देणे गरजेचे आहे. त्यांनी या ठिकाणी भेट दिली होती का याची चौकशी केली जाणार आहे. तसेच या घटनेची सर्वंकष चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
दोन दिवसात बैठक -
आजच्या या घटनेबाबत सर्व यंत्रणांची आगामी दोन दिवसात बैठक घेण्यात येणार असून "प्रमाणित कार्यपद्धती" या बैठकीत निश्चित करणार असल्याचे महापौरांनी सांगितले. आगीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या घरांचीसुद्धा महापौरांनी यावेळी पाहणी केली. तसेच नुकसान झालेल्या रहिवाशांना मोबदला देण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सध्या तरी जीवितहानी नसली तरी या दुर्घटनेत चार जण जखमी झाले आहेत. याप्रसंगी माजी विरोधी पक्षनेते व माजी नगरसेवक बाळा आंबेरकर उपस्थित होते.