मुंबई - भंडारा येथे सरकारी रुग्णालयाला आग लागून दहा बालकांचा मृत्यू झाला होता. मुंबईमधील १२५ रुग्णालयांनी अग्निसुरक्षा नियम धाब्यावर बसवल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईमधील रुग्णालयांना भेटी देणार असल्याचे महापौरांकडून कळवण्यात आले. आज महापौरांनी पालिकेच्या कूपर रुग्णालयात एक बैठकही घेतली. बैठकीच्या ठिकाणी सुमारे ५० ज्वलनशील सॅनिटायझरचे कॅन ठेवण्यात आले होते. या ज्वलनशील सॅनिटायझरच्या साठयाजवळ बसूनच महापौरांनी आढावा बैठक घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अग्निसुरक्षेचा आढावा -
भंडारा आगीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील रुग्णालयांचे फायर ऑडिट केले जात आहे. मुंबईमधील १,३०० रुग्णालयांपैकी १ हजार रुग्णालयांना मुंबई अग्निशमन दलाने नोटीस दिली आहे. त्यापैकी १२५ रुग्णालयांनी अग्निसुरक्षा नियमांची अंमलबजावणी केली नसल्याचे समोर आले आहे. अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत आहे कि नाही याची पाहणी स्वत: करण्याचा निर्णय महापौरांनी घेतला. आज त्या पालिकेच्या कूपर, बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर आणि भगवती रुग्णालयांना भेटी देणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून कळविण्यात आले होते.
महापौरांकडे तक्रारी करा -
आज सकाळी अंधेरी यारी रोड येथे सिलिंडर स्फोट झाल्याने आग लागली त्यात चार जण गंभीर जखमी झाले. त्या जखमींना आणि घटनास्थळाला महापौर किशोरी पेडणेकर यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान महापौरांनी अग्निशमन दलाला आणि पालिका प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले. अवैध सिलिंडरचा साठा तसेच ज्वलनशील पदार्थांचा साठा करून ठेवलेल्या ठिकाणांबाबत नागरिकांनी पुढे येऊन महापौर कार्यालयामध्ये तक्रारी द्याव्यात, असे आवाहन महापौरांनी केले आहे. त्याची दखल घेण्यासाठी महापौर कार्यालयात एक विशेष अधिकारी नियुक्त करणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
बैठकीची चर्चा -
यानंतर महापौरांनी कूपर रुग्णालयात जाऊन अंधेरी यारी रोड येथील आगीमधील जखमींची पाहणी केली. या पाहाणी नंतर महापौरांनी कूपर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे थकित वेतन न दिल्यास संबंधित कंत्राटदाराला कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले. ही आढावा बैठक ज्या ठिकाणी झाली त्याठिकाणी ज्वलनशील सॅनिटायझरने भरलेली सुमारे ५० कॅन ठेवण्यात आली होती. त्याच ठिकाणी महापौरांनी आढावा घेतला. सॅनिटायझरचे कॅनचा साठा बैठकीच्या खोलीत साठवून ठेवण्यात आला होता. याठिकाणी शॉकसर्किट किंवा इतर कारणाने आग लागल्यास रुग्णालयाला आग लागू शकते याकडे रुग्णालय प्रशासन आणि त्या ठिकाणी बैठक घेणाऱ्या महापौर या दोघांचे दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे. यामुळे महापौरांची सॅनिटायझरच्या कॅन जवळ घेतलेली बैठक चर्चेचा विषय बनली आहे.