मुंबई - लसावंतांना १५ ऑगस्ट २०२१पासून लोकल प्रवास मुभा देण्यात आली आहे. मात्र, रविवारी आणि सोमवारी सुट्टी असल्याने लोकल, रेल्वे परिसरात प्रवाशांची किरकोळ वर्दळ दिसून आली. मात्र, दोन डोस घेतलेल्या नागरिकांनी आजपासून लोकल प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे आज बऱ्याच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची अधिक वर्दळ दिसून आली आहे. मात्र, रेल्वेने प्रवाशांची गर्दी लक्षात घेता आजपासून लोकल फेऱ्या वाढविण्यात आलेल्या आहे.
हेही वाचा - लोकलचा पास मिळावा यासाठी ऑफलाईन प्रक्रिया सुरू, पहिल्याच दिवशी गोंधळ
लोकलमध्ये तुरळक गर्दी
कोरोना लशीचे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना १५ ऑगस्टपासून उपनगरीय लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार, बुधवारपासून कोरोना प्रमाणपत्राची आणि ओळखपत्राची पडताळणी करून पास देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. रेल्वे स्थानकांवर केवळ पासधारकांनाच लोकल प्रवासाची सुविधा देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार आज अनेक जण तिकीट खिडक्यांवर जाऊन एकमार्गी व परतीच्या तिकिटासाठी विचारणा करत होते. तसेच रविवारी स्वातंत्रदिन आणि सोमवारी पारशी नववर्षानिमित्त अनेक कार्यालयांना सुट्टी असल्यामुळे गर्दीचा प्रत्यक्ष परिणाम आजपासून दिसून आला आहे. आज अनेक रेल्वे स्थानकांत सकाळी प्रवाशांची गर्दी दिसून आली आहे. मात्र, प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने ७४ फेऱ्या आणि पश्चिम रेल्वेने ९९ फेऱ्या वाढविल्या आहेत.
95 टक्के लोकल फेऱ्या
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले, की राज्य सरकारच्या सूचनेनुसार स्वातंत्र्यदिनापासून कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवास मुभा देण्यात आली आहे. रेल्वे स्थानकांत नागरिकांच्या कोरोना प्रमाणपत्राची आणि ओळखपत्राची पडताळणी करण्याच्या काम सुरू आहे. मात्र, प्रवाशांची गर्दी लक्षात घेता आम्ही लोकल फेऱ्या वाढविल्या आहे. मध्य रेल्वेवर कोरोनापूर्वी एकूण १ हजार ७७४ लोकल फेऱ्या धावत होत्या. तर, १४ ऑगस्टपर्यंत १ हजार ६१२ फेऱ्या धावत होत्या. मात्र, सोमवारपासून आम्ही ७४ फेऱ्या वाढवून १ हजार ६८६ फेऱ्या धावण्यास सुरूवात झाली. तसेच गर्दीला नियंत्रणासाठी प्रत्येक रेल्वे स्थानकांवर आरपीएफ आणि लोहमार्ग पोलीस तैनात केले आहेत. पश्चिम रेल्वेवर कोरोनापूर्वी 1 हजार 367 लोकल फेऱ्या होत होत्या. तर, 14 ऑगस्टपर्यंत एकूण 1 हजार 201 फेऱ्या धावत होत्या. मात्र, सोमवारपासून 99 फेऱ्या वाढवून 1 हजार 300 फेऱ्या धावण्यास सुरूवात झाली.
हेही वाचा - Mumbai local: दोन दिवसात 55 हजार लसवंतांनी काढला पास; आता असा काढा ई-पास
'या' स्थानकांवर गर्दी
आजपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह, लसवंतांनी प्रवास करणे सुरू केले आहे. त्यामुळे महत्त्वाच्या आणि गर्दीचे स्थानक म्हणून ओळख असलेल्या कल्याण, डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा, सीएसएमटी, चर्चगेट, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरिवली, भाईंदर, वसई रोड, विरार, वडाळा रोड, वाशी, बेलापूर, पनवेल या स्थानकावर पीक अवरवेळी गर्दी दिसून आली. त्यानंतर स्थानकांवर तुरळक गर्दी दिसून आली.