मुंबई - मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. आणि जवळपास दोन कोटी लोकसंख्या असलेल्या या शहराची 'लाईफ-लाईन' म्हणजेच मुंबई लोकल! दर दिवशी लोकलच्या पश्चिम, मध्य, हार्बर व ट्रान्स हार्बर या मार्गांवर धावणाऱ्या रेल्वेंमधून जवळपास एक कोटीहून अधिक लोक प्रवास करतात. मात्र मुंबईकरांची ही 'लाईफ-लाईन' खरंतर 'डेथ-लाइन' बनत असल्याचं माहिती अधिकाराखाली समोर आलं आहे.
फलाटांची कमी उंची, कोसळणारे पादचारी पूल, रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात, भरधाव रेल्वेतून दरवाज्याजवळ प्रवास करीत असताना झालेला अपघात किंवा लोकलच्या टपावर बसून झालेले अपघात अशा विविध कारणांमुळे लोकल रेल्वेच्या मार्गांवर सन 2013 पासून ते 2018 पर्यंत तब्बल 19,431 जणांचा मृत्यू झाला असून, यात आतापर्यंत 20,023 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
अपघातात मृत्यू झालेल्या आणि जखमी झालेल्या लोकांची वर्षनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
- 2013- 3,506 मृत, तर 3,318 जखमी.
- 2014- 3,423 मृत, तर 3,299 जखमी.
- 2015- 3,304 मृत, तर 3,349 जखमी.
- 2016- 3,202 मृत, तर 3,363 जखमी.
- 2017- 3,014 मृत, तर 3,345 जखमी.
- 2018- 2,981 मृत, तर 2,173 जखमी.
हे आकडे लक्षात घेऊन तरी रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काही नव्या उपाययोजना करते का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.