मुंबई : आजपासून मुंबईकरांना हेल्मेट घालणे बंधनकारक असणार आहे. वाहतूक पोलिसांकडून याबाबत 25 मे रोजी परिपत्रक काढण्यात आले होते. या परिपत्रकाची अंमलबजावणी आजपासून सुरुवात होत आहे. मुंबईकरांना घराबाहेर पडताना हेल्मेट घालूनच बाहेर पडावे लागणार आहे. अन्यथा नियमाची पायामल्ली करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
ई-चलानद्वारेही दंड : वाहतूक पोलीस आजपासून प्रत्येक ठिकाणी हेल्मेटशिवाय मोटारसायकल चालवणाऱ्यांसह मागे बसणाऱ्यांवर कारवाई करणार आहेत. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांकडून ई-चलानद्वारेही दंड आकारला जाणार आहे. मुंबईत मोटारसायकल आणि मागे बसणाऱ्या व्यक्तींनाही हेल्मेट परिधान करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. वाहतूक पोलिसांनी 25 मे रोजी हा आदेश जारी केला होता. हेल्मेट अनिवार्य असूनही बहुतांश दुचाकी चालक हेल्मेट घालत नाहीत. त्यामुळे रस्ते अपघातात मृतांची संख्या वाढली आहे, असं अधिसूचनेत पोलिसांनी म्हटले आहे.
नियमांचं उल्लंघन केल्यास लायसन्स रद्द : नवीन नियम लागू करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी 15 दिवसांची मुदत दिली होती. यानंतर नियमांचं उल्लंघन केल्यास मोटार वाहन कायद्यामध्ये 500 रुपये दंड तसेच 3 महिन्यांसाठी लायसन्स निलंबित ( License suspended for 3 months ) करण्याची तरतूद करण्यात आली आहे. हेल्मेट घालणे दुचाकी चालक आणि त्याच्यामागे बसणाऱ्यांच्या हिताचे असल्याचे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, पगडी परिधान करणाऱ्यांना हेल्मेटच्या अनिवार्यतेतून सूट देण्यात आली आहे. दुचाकीस्वारांकडे ड्रायव्हिंग लायसन्स,( RC ) रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, इन्शुरन्स सर्टिफिकेट, तसेच प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
हेही वाचा- भीमा कोरेगाव प्रकरणात राज्यातील पाच पक्षप्रमुखांना समन्स, 30 जूनपर्यंत मत मांडण्याचे निर्देश