मुंबई - शहरातील डोंगरी भागातील केसरबाई ही ८० वर्षे जुनी इमारत आज सकाळी कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १० जण दगावले आहेत. ही इमारत कोसळताना अस्लम पटेल यांनी स्वतः पाहिले. पटेल यांनी हा थरारक अनुभव ईटिव्ही भारतला सांगितला आहे.
एकच आवाज झाला आणि आम्ही सैरावैरा पळू लागलो
"सकाळी सुमारे साडेअकराची वेळ होती. मी बाजूच्या इमारतीतून बाहेर जाण्यासाठी निघालो होतो. तितक्यात एक मोठा आवाज झाला. सुरूवातीला काहीच समजेनासे झाले. मला वाटले बाजूच्या इमारतीत काहीतरी पडलेला आवाज असावा. पण पाहतोय तर संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाली होती. संपूर्ण भागात धुळ पसरली होती. मुले आणि महिलांच्या आरोळ्या सुरू होत्या. त्यात पाऊस सुरू असल्याने काय करावे हे समजत नव्हते. रहिवाशांचा ओरडण्याचा आवाज ऐकून आपणही प्रचंड घाबरून गेलो होतो." अशी माहिती पटेल यांनी दिली.
केसरबाई या इमारतीत सुमारे सोळा कुटुंब रहायला होते. त्यात प्रत्येक घरात चार-पाच लोक असे जरी पकडले तरी किमान 40 हून अधिक लोक या इमारतीच्या खाली दबले असल्याची भीती पटेल यांनी व्यक्त केली. काही दिवसांपूर्वी या इमारतीला म्हाडा आणि संबंधित प्रशासनाने नोटीस बजावली होती. परंतु नोटीस नंतरही या इमारतीच्या पुनर्वसनसाठी काही विशेष प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आले नाही. यामुळेच लोकांना आपला जीव द्यावा लागला असल्याचा आरोपही पटेल यांनी यावेळी केला आहे.