मुंबई - मुंबईत कोरोना विषाणूचा फैलाव वाढत आहे. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने पुढील चार ते सहा आठवडे मुंबईसाठी महत्वपूर्ण आहेत. या कालावधीत कोरोनाला रोखण्यासाठी दररोज एक लाख लसीकरणाचे पालिकेने उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच रुग्णांवर उपचार करण्यासाठी येत्या ४८ तासात मागील वर्षाच्या जुलैप्रमाणे खाटा रिक्त ठेवून त्यावर कमी खर्चात रुग्णांवर उपचार करावेत असे आदेश मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिले आहेत. तसेच मुंबईतील दैनंदिन चाचण्यांची संख्या २५ हजारांवरून ५० हजारांवर नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.
हेही वाचा - Antilia Explosives Scare : 'वाझेंना अंबानीकडून हजारो कोटींची वसूल करायची होती खंडणी'
लसीकरणावर भर -
पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी मुंबईतील वाढत्या कोरोनासंदर्भात आढावा बैठक घेतली. यावेळी पालिका आणि आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना, मुंबईत लसीकरणासाठी निर्देशित खासगी रुग्णालयांची संख्या ५९ वरुन ८० पर्यंत नेण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. त्यानंतर, दररोज १ लाख याप्रमाणे ४५ दिवसांमध्ये ४५ लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. स्थानिक नगरसेवकांसह सामाजिक, सेवाभावी संस्थांच्या मदतीने लसीकरणाचा वेग वाढविण्यात येणार आहे असल्याचे आयुक्त म्हणाले. खासगी रुग्णालयांना सकाळी ९ ते रात्री ९ अशी लसीकरणाची सोय करण्यात येणार आहे. शक्य असल्यास २४ तास लसीकरणाची सोय करण्याचाही पर्याय विचारात घेण्यात येणार आहे.
खाटा राखीव ठेवा -
कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी रुग्णालयातील खाटा राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व शासकीय तसेच खासगी रुग्णालयांना कोविड-१९ उपचारांसाठी येत्या ४८ तासांत मागील वर्षी जुलै महिन्यात राखीव ठेवलेल्या खाटांच्या संख्येप्रमाणे राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वाढती रुग्णसंख्या पाहता येणारे चार ते सहा आठवडे हे अत्यंत महत्त्वाचे असतील. चाचण्यांसोबत बाधित रुग्णांचे प्रमाणही अधिक आढळू शकते. त्यामुळे सौम्य, मध्यम तसेच तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी पुरेशा संख्येने रुग्णशय्या उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रुग्णशय्यांमध्ये ऑक्सिजन तसेच आयसीयू बेडची संख्या पुरेशी राहील, याकडे लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. रुग्णांना महागडी औषधे, इंजेक्शन आदी पुरविताना खासगी रुग्णालयांनी रुग्णांच्या नातेवाईकांची संमती घ्यावी. तसेच व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवावी, अशा सक्त सूचना करण्यात आल्या आहेत. खासगी रुग्णालयांकडून जास्त बिले घेतली जाऊ नये म्हणून पालिकेच्या ऑडिटरची नियुक्ती करण्यात आल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले.
हेही वाचा - पोलीस आयुक्तांच्या बदलीनंतर गृहमंत्र्यांचा राजीनाम्याची शक्यता?