मुंबई - जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना विषाणूचा गेले दोन वर्षे मुंबईत प्रसार ( Mumbai Corona Cases ) आहे. या कालावधीत अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, आर सेंट्रल, आर साऊथ, पी नॉर्थ, एच वेस्ट, पी साऊथ डी या विभागात सर्वाधिक कोरोनाचा प्रसार ( Corona Hotspot In Mumbai ) झाला. यामुळे गेल्या दोन वर्षात हे विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. तर अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम, भांडुप, बोरिवली, कांदिवली, अंधेरी, घाटकोपर, धारावी या विभागात सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली ( Corona Death In Mumbai ) आहे.
मुंबईत कोरोनाचा प्रसार - मुंबईत मार्च 2020 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर कोरोनाचा प्रसार झपाट्याने झाला. गेल्या दोन वर्षात 10 लाख 61 हजार 038 नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी 10 लाख 40 हजार 624 नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 19 हजार 563 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ६११६ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०११ टक्के इतका आहे.
या विभागात सर्वाधिक रुग्ण - अंधेरी पश्चिम के वेस्ट येथे सर्वाधिक 91,621 रुग्णांची नोंद झाली आहे. त्या खालोखाल अंधेरी पूर्व 69798, आर सेंट्रल बोरिवली 68896, आर साऊथ कांदिवली 63840, पी नॉर्थ मालाड 61384, एच वेस्ट बांद्रा 51318, पी साऊथ गोरेगांव 50508, डी विभाग ग्रॅंटरोड 50463, एस विभाग भांडुप 48785, टी विभाग मुलुंड 45864 रुग्णांची नोंद झाली आहे.
या विभागात सर्वाधिक मृत्यू - मुंबईत एकूण 19,563 मृत्यू झाले आहेत. त्यापैकी सर्वाधिक 1575 मृत्यू के ईस्ट अंधेरी पूर्व भागात नोंदवले आहेत. त्या खालोखाल भांडुप एस वॉर्ड 1206, आर सेंट्रल बोरीवली 1153, पी नॉर्थ मालाड 1152, आर साऊथ कांदिवली 1111, के वेस्ट अंधेरी पश्चिम 1038, एन विभाग घाटकोपर 1004 तर जी नॉर्थ दादर धारावी 980 मृत्यूंची नोंद झाली आहे.
तरीही काळजी घ्या - ज्या विभागात कोरोनाचा प्रसार अधिक होता, त्या विभागावर विशेष लक्ष होते. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेने डॉक्टर आपल्या दारी, मुंबई मॉडेल, टेस्टिंग, ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट, रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या हाय रिस्क नागरिकांच्या चाचण्या, त्यांना विलगीकरण करणे आदी उपाययोजना केल्या. कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी जंम्बो कोविड सेंटर तसेच सेव्हन हिल रुग्णालय सुरू केले. यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश आले आहे. आजही रुग्णसंख्या आटोक्यात असली तरी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळणे, हात नेहमी स्वच्छ धुणे या कोरोना नियमांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
८३ वेळा शून्य मृत्यूची नोंद - मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण ८३ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा तर मे महिन्यात १२ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
एकूण रुग्ण - 10,61,038
बरे झालेले रुग्ण - 10,40,624
एकूण मृत्यू - 19,563
हेही वाचा - Mns Vs Shivsena : 'अटी शर्ती फक्त राज ठाकरेंसाठीच का?', मुख्यमंत्र्यांच्या सभेवरुन मनसेचा सवाल