मुंबई - देशात कोरोना व ओमायक्रॉनचे ( Omicron in Mumbai ) रुग्ण वाढत असताना आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना भाजपाचे नेते मुंबईत अटल महोत्सव ( Atal Mahotsav Mumbai ) कसा काय साजरा करू शकतात? अशा भाजपच्या नेत्यांना जबाबदार नेते कसे म्हणायचे? असा सवाल काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप ( Mumbai Congress President Bhai Jagtap ) यांनी उपस्थित केला. तसेच मुंबईत भाजपाने आयोजित केलेल्या ६ दिवसीय अटल महोत्सवाला विरोध दर्शविला आहे.
भाजपाचे नेते बेजबाबदार -
भाजपाचे नेते खासदार गोपाळ शेट्टी ( MP Gopal Shetty ) यांनी देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसानिमित्त ( Former Prime Minister Atal Bihari Vajpayee Birth Anniversary ) मुंबईतील कांदिवली पूर्व येथे अटल महोत्सवाचे आयोजन केलेले आहे. कोविड व ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्र सरकारने व राज्य सरकारने सार्वजनिक सभा व कोणत्याही प्रकारचे सामाजिक कार्यक्रम करण्यास बंदी घातलेली आहे. रुग्णवाढीच्या भीतीमुळे देशामध्ये पुन्हा पूर्वीप्रमाणे निर्बंध लावण्यावर विचार सुरु आहे. असे असताना सुद्धा भाजपाचे नेते अशा प्रकारचे ६ दिवसीय जाहीर कार्यक्रम कसे काय करू शकतात? अशा भाजपच्या नेत्यांना जबाबदार नेते कसे काय म्हणायचे, अशा तिखट शब्दांत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी, भाजपचे तमाम नेते व भाजप नेतृत्वाचा समाचार घेतला आहे.
अटलबिहारी वाजपेयी हे आम्हाला सुद्धा वंदनीय -
भाई जगताप पुढे म्हणाले की, देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे आम्हाला सुद्धा वंदनीय आहे. देशासाठी त्यांनी केलेले कार्य कुणीही विसरू शकत नाही. त्यांच्या जन्मदिवसाचा उत्सव हा व्हायलाच हवा. पण सध्या ज्या परिस्थितीतून देश जात आहे. देशात कोविड व ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. देशावर कोविडच्या तिसऱ्या लाटेचे संकट घोंगावत आहे. असे असताना अशा प्रकारचे महोत्सव घेणे कितपत योग्य आहे? भाजपचे नेते आपले सामाजिक भान व आपली सामाजिक जबाबदारी पूर्णपणे विसरून गेलेले आहेत का? मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष आणि एक जबाबदार नेता म्हणून याचा विरोध करत आहे.