मुंबई - केंद्रातील मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाली आहे. त्यामुळे काँग्रेसने आज राज्यभरात ठिकठिकाणी निषेध, आंदोलन केलेली आहेत. तसेच पत्रकार परिषदा आणि कार्यक्रम घेऊन मोदी सरकारच्या कारभाराची पोलखोल केली आहे. आज मुंबईतही मुंबई काँग्रेसतर्फे मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आलेला होता. या कार्यक्रमस्थळी पोलीस आल्याने मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप पोलिसांवर चांगलेच भडकले. त्यामुळे कार्यक्रमात काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झालेली होती. "आमच्या कार्यक्रमात तुम्ही काय करत आहात? तुमचं काय काम?" असा सवाल भाई जगताप यांनी पोलिसांना केला. त्यानंतर या कार्यक्रमातून चक्क पोलिसांनाच बाहेर काढण्यात आले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
"तर पहिली अटक मला करा"
गेल्या सात वर्षात भाजपने देशात काहीच विकास केला नाही. उलट देश भकास केला. गेल्या सात वर्षात काय केले? काय प्रगती केली? असा सवाल आम्ही त्यांना करत आहोत. आम्ही कायदा पाळून आंदोलन करत आहोत. जर आम्ही कायदा मोडून आंदोलन करत आहोत, असे वाटत असेल तर पहिली अटक मला करा, असे भाई जगताप यावेळी म्हणाले. आमच्या लहान मुलांच्या लस विदेशात का पाठवल्या, अशा घोषणाही काँग्रेसच्या या कार्यक्रमात देण्यात आल्या.
भाई जगताप यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'गेल्या सत्तर वर्षात देशाने जे कमावले ते अवघ्या सात वर्षात गमावलेल आहे. मोदी हे सर्वात अकार्यक्षम पंतप्रधान आहेत. केनिया सारखा लहान देश आपल्याला मदतीसाठी विचारणा करतो आणि केंद्र सरकार त्यांच्यापुढे कटोरा घेऊन उभे राहते. ही लाजिरवाणी बाब आहे', अशी खोचक टीका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केंद्र सरकारवर केलेली आहे.