मुंबई - मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांना राज्याच्या मुख्य सचिवपदावर बढती देण्यात आली आहे. आचारसंहितेदरम्यान निवडणूक आयोगाने मेहतांच्या नियुक्तीला हिरवा कंदील दाखविला. त्यानंतर राज्य सरकारने त्यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती केली आहे. मेहता हे पुढील 3 दिवसांत पदभार स्वीकारणार आहेत.
निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे अजोय मेहता यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यावर निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखविल्याने त्यांच्या नियुक्तीचा अडसर दूर झाला.
युपीएस मदान यांची स्वेच्छानिवृत्ती-
अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी बढती झाल्याने मुंबई महापालिकेच्या रिक्त झालेल्या आयुक्तपदासाठी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. युपीएस मदान यांची या वर्षीच्या मार्च महिन्यात मुख्य सचिवपदी नियुक्ती केली होती. येत्या ऑक्टोबर महिन्यात मदान निवृत्त होणार आहेत. मात्र तत्पूर्वीच मदान यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याचे बोलले जात आहे. युपीएस मदान यांची महामंडळ अथवा आयोगाच्या संचालकपदी नियुक्ती केली जाणार असल्याची प्रशासकीय वर्तुळात चर्चा आहे.
सर्वाधिक काळ पदभार स्वीकारणारे अजोय मेहता हे पहिले आयुक्त -
अजोय मेहता यांनी २०१५ मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडून मुंबई महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला होता. तब्बल ४ वर्षे त्यांनी महापालिका आयुक्तपदाची सूत्रे सांभाळली. अजोय मेहता यांनी २७ एप्रिल २०१९ रोजी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची ४ वर्षे पूर्ण केली. मुंबई महापालिकेच्या कारभारात सर्वाधिक काळ पदभार स्वीकारणारे अजोय मेहता हे पहिले आयुक्त आहेत. यापूर्वी सदाशिव तिनईकर यांनी १९८६ ते १९९० मध्ये मुंबई महापालिकेचे आयुक्त होते. त्यांनी ३ वर्षे ९ महिने आणि ८ दिवस इतका कालावधी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावर पूर्ण केला होता.
अजोय मेहता यांनी महापालिकेच्या कारभारात शिस्त आणली. शिवसेनेच्या कारभारावर वचक ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेहता यांची महापालिका आयुक्तपदावर नियुक्ती केली होती, असे राजकीय वर्तुळात बोलले जाते. अजोय मेहता हे येत्या सप्टेंबरमध्ये निवृत्त होणार आहेत.