मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च महिन्यात दहावीच्या परीक्षांचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यामध्ये मुंबई महापालिकेच्या शाळांचा दहावीचा निकाल यावर्षी ५३.१४ टक्के लागल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी ममता राव यांनी दिली. पालिकेच्या शिक्षण विभागाने जाहीर केलेली आकडेवारी पाहता मागील वर्षांपेक्षा महापालिका शाळांचा निकाल यावर्षी २० टक्क्यांनी घसरल्याचे समोर आले आहे.
यंदा मुंबई महापालिकेच्या ४९ अनुदानित व १६१ विनाअनुदानित अशा एकूण २१० माध्यमिक शाळांमधून १३ हजार ५६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ७ हजार २०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांमध्ये ११ जणांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. मुलुंडच्या गुरू गोविंदसिंह पालिका शाळेतील राम महेंद्रप्रसाद कैसवार याने ९३.२० टक्के गुण मिळवून मुंबई महापालिका शाळांमधून पहिला क्रमांक मिळवला आहे. एन. एम. जोशी मार्ग पालिका शाळेतील पूजा कनोजीया या विद्यार्थीनीने ९२.६० टक्के मिळवून दुसरा, तर प्रभादेवी येथील ग्लोब मिल पॅसेज शाळेतील मल्लिका अरुतला हिने ९२.४० टक्के मिळवून तिसरा क्रमांक मिळवला आहे. पालिकेच्या तीन शाळांचा निकाल १०० टक्के लागला असल्याची माहिती राव यांनी दिली.
कसा घसरला टक्का -
पालिका शाळांची विद्यार्थी संख्या घटत असताना निकालाचा टक्काही घसरल्याचे दिसत आहे. पालिका शाळेचा २०१६ मध्ये दहावीचा निकाल ७६.९७ टक्के लागला होता. २०१७ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत महापालिका शाळांचा निकाल ६८.९१ पर्यंत खालावला. २०१८ मध्ये या निकालात ५ टक्क्यांची वाढ होऊन ७३.८१ टक्के निकाल लागला होता. यावर्षी मात्र ५३.१४ टक्के निकाल लागला असून मागील वर्षांपेक्षा २० टक्क्यांनी पालिका शाळांचा निकाल घसरला आहे. गेल्या चार वर्षांत पालिका शाळांचा यावर्षी सर्वात कमी निकाल लागला आहे.
शाळांचा निकालही घसरला -
मागील वर्षी पालिका शाळांचा निकाल ५ टक्क्यांनी वाढून ७३.८१ टक्के लागला होता. त्यात १३ पालिका शाळांचा निकाल १०० टक्के लागला होता. यावर्षी ५३. १४ टक्के निकाल लागला असून अवघ्या ३ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.