मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने तयारी सुरु केली आहे. काँग्रेस स्थापना दिनाचे औचित्य साधत २८ डिसेंबर रोजी शिवाजी पार्कवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा घेतला जाणार आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी दिली आहे. टिळक भवन येथे मुंबई काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक झाली त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
'युती वा आघाडी करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली नाही'
महानगरपालिका निवडणुकीची रणनिती ठरवण्यासाठी आजची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत महापालिका निवडणुकीत कोणत्या पक्षाबरोबर युती वा आघाडी करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली नाही. मात्र, स्थानिक पातळीवरील समिकरणे पाहून स्थानिक नेतेच त्यासंदर्भात निर्णय घेतील असे एच.के पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
'पंतप्रधान किंवा केंद्रीय गृहमंत्री यांनी पाहणीसुद्धा केली नाही'
अतिवृष्टी व महापुराने महाराष्ट्राचे अतोनात नुकसान केले आहे. परंतु, या नैसर्गिक आपत्तीवेळी केंद्र सरकार महाराष्ट्राच्या मदतीला धावून आले नाही. अजूनही केंद्र सरकारची कुठलीही मदत महाराष्ट्राला मिळालेली नाही. एनडीआरफची मदतही मिळालेली नाही. महाराष्ट्रावर आपत्ती कोसळली असताना, पंतप्रधान किंवा केंद्रीय गृहमंत्री यांनी पाहणीसुद्धा केली नाही, हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्र संकटात असताना पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री कुठे होते? असा सवालही एच. के. पाटील यांनी विचारला आहे.
'मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत चर्चा'
आजची बैठक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी होती. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बैठकीत चर्चा झाली. यात महाविकास आघाडी सरकार संदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. मात्र, हा विकास आघाडी सरकार योग्य काम करत आहे. असे मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बैठकीनंतर व्यक्त केले आहे. आजच्या या बैठकीला एच के पाटील यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मत्ससंवर्धन मंत्री अस्लम शेख, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, माजी खासदार संजय निरुपम, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान आदी उपस्थित होते.