मुंबई- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची (Param Bir Singh property) मालमत्ता जप्त होण्याची शक्यता आहे. त्यांना फरारी घोषित केल्यानंतर जर त्यांनी एक महिन्याच्या आत संपर्क साधला नाही तर त्यांची संपूर्ण मालमत्ता जप्त केली जाऊ शकते. जाणून घेऊया त्यांची मालमत्ता कोठे आणि किती आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Ex home Minister Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटी रुपये वसुलीचा आरोप केला. या प्रकरणानंतर ईडीने तपास करून अनिल देशमुख यांना अटक केली आहे. आरोप केल्यानंतर आपल्याकडे यासंदर्भातली पुरावे नाहीत, असे सांगत परमबीर सिंग यांनी देशाबाहेर पलायन केल्याची चर्चा आहे. सध्या ते बेल्जियममध्ये असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान पोलिसांनी परमबीर सिंग यांना फरार घोषित केले आहे. परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्यात आल्यानंतर त्यांच्या विरोधात कारवाई करताना त्यांची सर्व मालमत्ता जप्त केली जाऊ शकते.
हेही वाचा-Jayant Patil on Param Bir Singh : मदत केल्याशिवाय परमबीर सिंग देशाबाहेर जाऊ शकत नाहीत - जयंत पाटील
मालमत्ता जप्त करण्याची कायदेशीर प्रक्रिया
एखादा गुन्हेगार अथवा आरोपी सापडत नसेल किंवा अटक टाळण्यासाठी पळ काढत असेल तर अशावेळी संबंधित गुन्हेगाराची मालमत्ता जप्त केली जाऊ शकते. मात्र, त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया करावी लागते. भारतीय संविधान कायद्यानुसार कलम 81 आणि 82 अन्वये ही कारवाई करता येते. आरोपीच्या घरावर पोलीस वॉरंट चिकटवितात. परमबीर सिंग यांच्या नावावर अनेक घरे आहेत. त्यामुळे या सर्व ठिकाणी वॉरंट चिटकविण्यात येऊ शकते. पोलीस त्यांच्या सर्व मालमत्तांचा पंचनामा करतील तसेच परमवीर सिंगांवरील कारवाईची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे जाहीरही करण्यात येईल. पोलिसांकडून निर्धारित तारखेपर्यंत वाट पाहून मालमत्तेची जप्तीची कारवाई करण्यासाठी न्यायालयात परवानगीसाठी अर्ज दाखल केला जाईल.
किती आहे परमबीर सिंग यांची ज्ञात मालमत्ता?
परमबीर सिंग यांची एकूण मालमत्ता आठ कोटी 54 लाख रुपये असल्याची अधिकृत माहिती आहे. त्यानुसार नवी मुंबईमध्ये तीन कोटी 64 लाख रुपयांचा फ्लॅट (Param Bir Singh flats in Mumbai) आहे. तर जुहू येथे चार कोटी 64 लाख रुपयांचा फ्लॅट आहे. हरियाणामध्ये असलेल्या जमिनीची किंमत बावीस लाख रुपये आहे. या माध्यमातून त्यांना वर्षाला 25 लाख रुपये मिळतात. नवी मुंबईतील सदनिकेचा भाड्याच्या माध्यमातून त्यांना दर वर्षी सुमारे पावणे दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. हरियाणा येथील फरीदाबादमध्ये त्यांच्या नावाने जमीन आहे. या जमिनीची सध्या 14 लाख रुपये इतकी किंमत आहे. तर चंदीगडमध्ये असलेल्या घराची किंमत चार कोटी रुपये आहे. या मालमत्तेवर त्यांच्या 2 भावांचीसुद्धा नावे आहेत.
हेही वाचा-ठिकाणाबद्दल माहिती दिल्यानंतरच सुनावणी, सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंगांना फटकारले
बेनामी मालमत्ता सुद्धा चर्चेत
परमबीर सिंग यांनी समृद्धी महामार्गालगत नाशिक येथे बेनामी जमीन खरेदी केल्याची चर्चा आहे. त्यांचा निकटवर्तीय असलेल्या पुनमियाच्या नावाने या जमिनींची खरेदी झालेली आहे. त्यामुळे आता या सर्व मालमत्तांवर पोलीस टाच आणण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने दक्षता घ्यायला हवी होती-
न्यायालयाने परमबीर सिंग(Param Bir Singh) यांना फरार घोषित केले आहे. ते देशाबाहेर पळून गेले, अशा प्रकारची माहिती समोर येत आहे. मात्र, कोणीतरी मदत केल्याशिवाय त्यांना देशाबाहेर पळून जाता येत नाही. अँटिलिया प्रकरणाचा(Antilia Bomb case) तपास परमबीर सिंग यांच्या नेतृत्वाखाली होत होता. मात्र, त्यांच्यावरच याप्रकरणात आरोप होऊ लागल्यानंतर केंद्र सरकारने या बाबतीत लक्ष घालून सिंग देशाबाहेर जाणार नाहीत याची दक्षता घ्यायला पाहिजे होती, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री जयंत पाटील(Minister Jayant Patil) यांनी दिली आहे.
परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे ‘टार्गेट’ दिल्याचा खळबळजनक आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना येथील दंडाधिकारी न्यायालयाने बुधवारी फरार घोषित केले. आज सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of India) फरार असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ( Parambir Singh ) यांना त्यांचा ठावठिकाणा उघड करण्यास सांगितले आहे आणि म्हटले आहे की ते देशाच्या किंवा जगात कोणत्या भागात आहेत हे सांगल्यानंतरच अटकेपासून संरक्षणासाठी सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी होईल.