पणजी - देशातील सर्वोत्तम पोलीस दलापैकी गोवा पोलीस दल आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे ठिकाण आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षारक्षकांना (एनएसजी)च्या धर्तीवर दलातील सर्वच स्तरातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. ज्यामुळे एखाद्या दुर्घटनेत अन्य दलावर अवलंबून वेळ वाया न घालवता कारवाई करणे सोपे जाईल, असे प्रतिपादन गोव्याचे पोलीस महासंचालक मुकेश कुमार मीणा यांनी आज केली. गोवा पोलीस स्थापना दिनानिमित्त पणजीतील मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पदकांची पाहणी
मीणा यांच्या हस्ते राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यांतील 28 कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले. त्याबरोबरच कुडचडे, म्हापसा आणि विचार वास्को पोलीस स्टेशनला अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकांना फिरते चषक, रोख रक्कम आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तर देशातील सर्वोत्तम पोलीस स्थानकांत 9वा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तत्पूर्वी मीणा यांनी पोलीस पदकांची पाहणी करत मानवंदना स्वीकारली.
'अस्वच्छता आढळल्यास कारवाई'
यावेळी मीणा म्हणाले, की गोवा पोलिसांचे कार्य उत्तम आहे. एखाद्या घटनेतील सांघिक कार्यही उत्तम आहे. परंतु, काही ठिकाणी स्वच्छता दिसत नाही. यापुढे अस्वच्छता आढळल्यास संबंधित निरीक्षकांवर कारवाई केली जाईल. हे पर्यटकांसाठी एक चांगले आणि शांतीमय ठिकाण आहे. परंतु, अतिआत्मविश्वासावर अवलंबून राहता नये. काही अडचणी आल्या तरीही आपण पुढे असले पाहिजे. महामारीच्या काळातील कार्य वाखाणण्याजोगे आहे. 900 कर्मचारी बाधित झाले, पण आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही. कायदा आणि सुव्यवस्था ही तांत्रिक आणि मानसिकता यावर अवलंबून असल्याने योग्य तऱ्हेने हाताळली पाहिजे.
'अमली पदार्थाची पाळेमुळे खणून काढावी'
एखाद्या आंदोलनामुळे कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कारवाई केली पाहिजे. तिचे स्वरूप तेथील परिस्थितीवर अवलंबून असेल, असे सांगून राज्यातील अमली पदार्थाची पाळेमुळे खणून काढली पाहिजे. यासाठी जर माहिती मिळाली तर तत्काळ कारवाई करण्यात यावी. किनारी सुरक्षेचा आढाला घेऊन अधिक बळकट करण्यात येईल. कामाचा हुरूप वाढावा, यासाठी राज्य सरकार नव्या इमारती उभारणीकरीता निधी उपलब्ध करून देत आहे. ज्यामुळे केपे पोलीस स्टेशन आणि सांताक्रूझ आऊटपोस्ट इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे करत असताना पोलीस दलासाठी यापुढे संचलन (परेड) नियमित स्वरूपात असेल. तसेच प्रशिक्षण वाढविण्यात येणार आहे. राष्ट्रीय सुरक्षारक्षाकांच्या धर्तीवर प्रशिक्षण देण्यात येईल. ज्यामुळे कोणत्याही घटनेस सामोरे जाण्याची क्षमता निर्माण होईल आणि अन्य दलाची मदत मिळेपर्यंत वेळ न दवडता कार्यवाही करता येईल. आवश्यक शस्त्रास्त खरेदी करत सुरक्षाविभाग मजबूत करण्यात येईल. त्याबरोबर क्रीडा विभागासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.
1961पासून साजरा होतो दिवस
19 डिसेंबर 1961रोजी गोवा पोर्तुगीज राजवटीतून मुक्त झाला. त्यानंतर 20 डिसेंबर 1961रोजी गोवा पोलीस दल स्थापन करत एन. आर. नागू यांनी गोव्याचे पोलीस महासंचालक म्हणून जबाबदारी स्वीकारली. तेव्हापासून हा दिवस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो आणि डीजीपी इगसिग्निया एक्सलन्स पुरस्कार दिले जातात.