मुंबई - देशभरात 15 जानेवारीपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सर्व टोलनाक्यांवर फास्टॅग बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे फास्टॅगची मागणी वाढली आहे. हीच बाब लक्षात घेत आता बाजारात नकली-बोगस फास्टॅग विकत नागरिकांची फसवणूक केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फास्टॅग आहे पण टोलनाक्यावर तो चालतच नसून त्याची तपासणी केली असता तो नकली असल्याचे सिद्ध होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडूनच ही माहिती देण्यात आली असून अधिकृत फास्टॅग खरेदी करण्याची आणि फास्टॅग खरेदी करताना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्राधिकरणाने केली आहे. दरम्यान राज्यात मात्र असा एकही प्रकार आढळून आलेला नाही वा अशी एकही तक्रार अद्याप आली नसल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा(एमएसआरडीसी)ने दिली आहे.
15 फेब्रुवारीपासून फास्टॅग बंधनकारक
इलेक्ट्रॉनिक टोल वसुलीसाठी फास्टॅग प्रणाली आणण्यात आली आहे. जानेवारी 2020मध्ये आणण्यात आलेली ही प्रणाली आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सर्व टोलनाक्यावर बंधनकारक करण्यात आली आहे. फास्टॅग नसेल तर प्राधिकरणाच्या टोलनाक्यावर दुप्पट टोल वसूल केला जात आहे. दरम्यान, राज्यात एमएसआरडीसीच्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तसेच वांद्रे-वरळी सी लिंकवर फास्टॅगची 100 टक्के अंमलबजावणी सुरू झाली आहे. तर उर्वरित टोलनाक्यावर येत्या महिन्याभरात फास्टॅगची 100 टक्के अंमलबजावणी सुरू होणार आहे. त्यामुळे आता शक्य तितक्या लवकर फास्टॅग लावणे वाहनचालकांसाठी गरजेचे झाले आहे. त्यात मोटार व्हेइकल अॅक्टमध्येही तरतूद करत फास्टॅग बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात वाहतूक पोलिसांकडूनही फास्टॅग नसलेल्या वाहनावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे आता फास्टॅग खरेदी करण्यासाठी वाहनचालकाची गर्दी होत आहे. फास्टॅगची मागणी वाढली आहे.
नकली फास्टॅगची विक्री
फास्टॅगची वाढती मागणी लक्षात घेता देशात नकली फास्टॅगची विक्री केली जात आहे. हा फास्टॅग NHAI/IHMCLच्या फास्टॅगसारखाच दिसतो. हुबेहूब या फास्टॅगप्रमाणे नकली फास्टॅग असल्याने नागरिकांची सहज फसवणूक होत असून अशा तक्रारी आता देश स्तरावर येत आहेत. फास्टॅग असताना ही टोलनाक्यांवर फास्टॅग चालत नाही. तेव्हा फास्टॅगची तपासणी केली असता फास्टॅग नकली असल्याचे सिद्ध होत आहे. त्यामुळे वाहनचालकांना दुप्पट टोल द्यावा लागत आहे. तर दुसरीकडे फास्टॅगचे पैसे वाया जात आहेत. त्यामुळे आता फास्टॅग खरेदी करताना वाहनचालकांना-नागरिकांना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
'अधिकृत फास्टॅगच खरेदी करा'
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नकली फास्टॅगच्या विक्री होत असल्याचे उघड झाल्यानंतर याची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याची गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार अधिकृत फास्टॅगचीच खरेदी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. www. ihmcl.co.in यावर जात MyFastg Appवरून फास्टॅग खरेदी करावे. तर यूजर्स लिस्टेड बँका आणि ऑथोराइज्ड एजन्ट्सकडूनच फास्टॅग खरेदी करावेत, असे आवाहनही प्राधिकरणाने केले आहे. तर काहीही तक्रार असल्यास, काही माहिती असल्यास IHMCLच्या वेबसाइटवर माहिती द्यावी, असेही अवाहन प्राधिकरणाने केले आहे.
दिलासादायक! राज्यात अजून तरी प्रकार नाही
नकली फास्टॅगची विक्री देशात होत आहे. तशा तक्रारी आल्या आहेत. पण राज्यात मात्र (एमएसआरडीसीच्या टोलनाक्यांवर) अजून असा एकही प्रकार आढळलेला नाही वा तशी तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती विजय वाघमारे, सहव्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे. अद्याप अशी तक्रार नसल्याने अजून तरी नकली फास्टॅगची विक्री होत नसल्याचा दावा करत ही दिलासा दायक बाब असल्याचेही स्पष्ट केले जात आहे. दरम्यान बँका आणि टोलप्लाझावरील अधिकृत स्टॉलमधून खरेदी करण्याचे आवाहन ही वाघमारे यांनी केले आहे.