मुंबई - पत्रावाला चाळ प्रकरणात गैरव्यवहार केल्याप्रकरणी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांची शुक्रवारी (दि. 1 जुलै) ईडी कार्यालयात तब्बल दहा तास कसून चौकशी झाली. त्यानंतर आज (दि. 2 जुलै) पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी आपण कुठल्याही कारवाईला घाबरत नसून भाजपने शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यामागचे कारण म्हणजे मुंबईतून शिवसेनेचा पराभव करणे आहे, असे म्हटले आहे. यावेळी संजय राऊत म्हणाले, आपण कोणाला फसवलेल नाही आहे. म्हणून कुठल्याही कारवाईला आपण घाबरत नाही.
प्राण जाय पर वचन न जाये - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या मातोश्री या घराबाहेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांचे अभिनंदनाचे होर्डिंग लावण्यात आले आहेत. पण, त्या होर्डिंगवरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो गायब आहे. यावरून संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी शिवसैनिकांना फसवलेले आहे. त्यातूनच लोकांना भ्रष्ट करण्याचे हे काम सुरू आहे. ही भारतीय जनता पक्षाची रणनीती आहे. मलाही मार्ग होता गुवाहाटीला जाण्याचा पण माझी चौकशी झाली. प्राण जाय, पर वचन न हे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवले आहे.
शिवसेनेचा पराभव करण्यासाठी मुख्यमंत्री - राज्यात नवीन सरकार आलेले आहे. ते विट्टी व दांडूच आहे, असा टोमणा मारत नव्या विट्टी दांडूला मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे. मुंबईतील शिवसेनेची ताकद नष्ट करायची आहे.शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना मुंबईत शिवसेनेचा पराभव करण्यासाठी मुख्यमंत्री केलेले आहे व मंत्रिमंडळात स्थान दिलेल आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
आमचे सर्व खासदार एकजूट - शिवसेनेच्या आमदारानंतर आता खासदारांमध्येही बंडखोरी होणार असल्याची बातमी समोर येत आहे. शिवसेनेचे तब्बल 14 खासदार बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, शुक्रवारीच खासदारांची बैठक झाली. मी त्या बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही. कारण त्याच वेळी मला भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यालयाने बोलावले होते, असे म्हणत इडीवरही निशाणा साधला. त्या बैठकीच्या वेळी खासदार उपस्थित होते. शिवसेनेत आमदार व खासदार निवडून येण्याची ताकद आहे. पक्षाचा शिवसैनिक जो कार्यकर्ता आहे तो कुठल्याही मोहाला बळी पडत नाही. मलाही पाडण्याचा प्रयत्न झाला व जर का मी पडलो असतो, तरी मी शिवसेना सोडली नसती. खासदारांमध्ये एकजूट आहे. या चुकीच्या बातम्या समोर येत आहेत. काँग्रेस खूप वेळा फुटली प्रत्येक जण म्हणतो आम्ही गांधीच्या विचाराचे आहोत. महाराष्ट्रात चार काँग्रेस पक्ष आहेत.
एकनाथ शिंदे व फडणवीस यांना टोमणा - ठाकरे व शिवसेना या एका नाण्याच्या दोन बाजू नाही तर ती एकच बाजू आहे. जे मुख्यमंत्री पदाच्या तयारीत होते, ज्यांनी नवीन सरकार स्थापन केले त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ स्वीकारा, असा आदेश दिला जातो. जे मुख्यमंत्री आहेत ते ज्युनिअर मंत्री आहेत. त्यांच्या अंडर काम करावे लागते. असे सांगत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्री पदावर टोमणा मारला आहे. भाजपमध्ये शिस्त व आदेशाचे पालन केले जाते त्या अनुषंगाने ते वागले, असेही राऊत म्हणाले.
शिंदे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई - एकनाथ शिंदे यांना शिवसेनेने नेतेपदावरून काढले आहे, ही शिस्तभंगाची कारवाई आहे. ती पक्षप्रमुखाच्या स्वाक्षरीने झालेली आहे. त्यात नवीन असे काहीच नाही.
हेही वाचा - मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात रात्री उशिरा मंत्रिमंडळ खातेवाटपाबाबत चर्चा