मुंबई - "दुर्दैवाने महाराष्ट्रात सर्व असंविधानिक काम सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी सिंगल लार्जेस्ट पार्टीला बोलवायला हवे होते. आपण कोणी पाहिले का की, राज्यपालांनी अशा एखाद्या पक्षाला बोलावले. यांनी कुठे असा ठराव केलाय का की, आम्ही पक्षाबाहेरील व्यक्तीला मुख्यमंत्री करतोय. मग तुम्ही एकनाथ शिंदे यांना सत्ता स्थापनेसाठी कोणत्या अधिकारात बोलावले, त्यांना कोणत्या पक्षाचे नेते म्हणून तुम्ही बोलावले ?" असा असावा खासदार अरविंद सावंत ( MP Arvind Sawant ) यांनी उपस्थित केला आहे. आजच्या अध्यक्षपदाच्या मतदानावरही त्यांनी शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. या सर्व आमदारांनावर कारवाई करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली असल्याची माहिती सावंत यांनी दिली.
ज्यांच्यावर निलंबनाची कारवाई त्यांनीच शपथ घेतली - खासदार सावंत म्हणाले की, "शिवसेना आपल्या पद्धतीने कायदेशीर लढाई लढत आहे. सुरुवातीला 12 नंतर 16 आमदारांना अपात्र करण्याबाबत नोटीस देण्यात आली. त्यासंदर्भात आम्ही सर्वोच्च न्यायालय न्यायालयापर्यंत गेलेलो आहोत. न्यायालयाने अकरा तारखेपर्यंतची वेळ दिलेली आहे. असे असताना ज्यांच्यावर निलंबनाची कारवाई करायची आहे अशांनी आज शपथ घेतली आहे. हे कसे संविधानिक आहे हेच आम्हाला कळत नाही."
त्यांच्यावर कारवाई करा - "आज देखील अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना मतदान करावे असा पक्षादेश जारी केला. हा पक्ष आदेश जारी केल्यानंतर आपण सर्वांनीच पाहिले की, मतदान झाले, त्यानंतर मतमोजणी झाली त्यावेळी लक्षात आले की, या 39 बंडखोर आमदारांनी शिवसेनेचा पक्ष आदेश पाळला नाही. त्यानंतर आमचे गटनेते पीठासीन अध्यक्षांना जाऊन भेटले आणि त्यांना एक पत्र दिले. आणि, ज्या 39 आमदारांनी पक्ष आदेशाच्या विरोधात मतदान केले त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. त्यानुसार घटनेतील परिशिष्ट 10 मधील कलम 2 अ नुसार या कलमाचे उल्लंघन होते आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आम्ही केली आहे." असे सावंत म्हणाले.
हेही वाचा - BJP National Executive in Hyderabad: हैदराबादमध्ये 'BJP'ची कार्यकारिणी; पहा काय म्हणाले 'CM' योगी