मुंबई - केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी गेले चार महिने दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत, दरम्यान कृषी कायद्यांविरोधात शुक्रवारी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने भारत बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला अनेक पक्षांनी पाठिंबा दिला, मात्र मुंबईकरांनी या बंदकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. मुंबईत सर्व दुकाने व सेवा सुरळीत सुरू आहेत.
शेतकरी नोव्हेंबरपासून कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करत आहेत. शुक्रवारी या आंदोलनाला 4 महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने निवेदन जारी करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला चार महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज भारत बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे या निवेदनात म्हटले होते. त्यानुसार सकाळी 7 वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या बंदला संयुक्त किसान आघाडीसह विविध शेतकरी संघटना, कामगार संघटना, विद्यार्थी संघटना यांनी पाठिंबा दिला आहे. मात्र मुंबईत बंददरम्यान सर्व व्यवहार सुरळीत सुरू असल्याचे चित्र आहे.
बंदमध्ये व्यापारी संघटनाचा सहभाग नाही
संयुक्त किसान मोर्चाकडून शुक्रवारी बारा तासांचा भारत बंद पुकारण्यात आला आहे. मात्र त्याचे पडसाद उमटताना दिसत नाहीत, प्रमुख व्यापारी संघटना या बंदमध्ये सहभागी झाल्या नाहीत. त्यामुळे बंददरम्यान सर्व व्यवहार सुरू आहेत. दरम्यान दुसरीकडे आज केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसचे नेते मंत्रायलाच्या बाजूला असलेल्या महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर एक दिवशीय उपोषणाला बसले आहेत.
हेही वाचा - औरंगाबाद; आरोग्य विभागाने दिल्या लॉकडाऊनच्या सूचना; तूर्तास असा निर्णय नाही - पालकमंत्री