मुंबई - शहर परिसरात मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला असून गेले पाच महिने महापालिका कोरोनाची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यात काही प्रमाणात पालिकेला यश आले होते. मात्र, ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणांमुळे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. आज सोमवारी मुंबईत कोरोनाच्या 2256 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
एकूण मृतांपैकी 24 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 18 पुरुष तर 13 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 71 हजार 949 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 8 हजार 178 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 1431 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 1 लाख 32 हजार 349 वर गेला आहे. सध्या मुंबईत 31 हजार 063 सक्रिय रुग्ण आहेत.
हेही वाचा - कोरोना पॉझिटिव्ह महिलेला निगेटिव्ह सांगून पाठवले घरी, दुसऱ्या दिवशी महिलेचा मृत्यू..!
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 56 दिवस तर सरासरी दर 1.24 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 564 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 8 हजार 637 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 9 लाख 25 हजार 148 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
असे वाढले रुग्ण
दिनांक | रुग्णसंख्या |
---|---|
2 सप्टेंबर | 1622 |
3 सप्टेंबर | 1526 |
4 सप्टेंबर | 1929 |
5 सप्टेंबर | 1735 |
6 सप्टेंबर | 1910 |
7 सप्टेंबर | 1788 |
8 सप्टेंबर | 1346 |
9 सप्टेंबर | 2227 |
10 सप्टेंबर | 2371 |
11 सप्टेंबर | 2172 |
12 सप्टेंबर | 2321 |
13 सप्टेंबर | 2085 |
14 सप्टेंबर | 2256 |