मुंबई - कोकणात गणोशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी बसचे आरक्षण सुरू झाल्यावर नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. आज (गुरुवार) संध्याकाळपर्यंत 3 हजार प्रवाशांनी एसटी बसच्या प्रवासाचे आरक्षण केले आहे. आज पहिली बस 22 प्रवाशांना घेऊन कुर्ला नेहरू नगर स्थानकातून कोकणात कणकवलीला रवाना झाली. तर, 16 नियमित आणि 11 जादा बस, अशा एकूण 21 बसेस आज कोकणात रवाना झाल्या.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी झालेल्या भागांचा घेतला आढावा, नागरिकांना तातडीने सहाय्य करण्याचे निर्देश
कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी 6 ते 12 ऑगस्टपर्यंत एसटीने 400 जादा बस उपलब्ध करून दिल्या आहेत. मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकातून सुटणाऱ्या बसेस कोकणातील जिल्हा व तालुक्याच्या मुख्यालयापर्यंत थेट धावणार आहेत. तेथून पुढे स्थानिक आगाराच्या एसटी बसेस प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी उपलब्ध असतील. 5 ऑगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे कोकणात जाऊ न शकणाऱ्या 22 बसेस आज सुटणार आहेत. सर्वाधिक आरक्षण हे 10 व 11 ऑगस्टसाठी झाले असून या दोन दिवसांसाठी 150 बसेस आरक्षणासाठी महामंडळाने उपलब्ध केल्या आहेत.
आजपासून ग्रुप बुकिंगला सुरुवात झाली असून 3 बसेस बुक झाल्या आहेत. ग्रुप बुकिंगसाठी मुंबई विभागातून 100 गाड्या लावल्या आहेत़. दरवर्षी 3 हजार ते 3200 गाड्या सुटतात. प्रत्येक गाडीत 48 प्रवासी असायचे. गणोशोत्सवसाठी यंदा 400 गाड्यांचे टार्गेट आहे. मात्र, कोरोनामुळे जास्तीत जास्त 200 ते 300 गाड्या सुटतील तेही फक्त 22 प्रवासी घेऊन, असा अंदाज एसटी काँग्रेस युनियनने व्यक्त केला आहे.