मुंबई - कॊरोना लसीच्या मानवी चाचण्या आता तिसऱ्या टप्प्यात असल्याने आता येत्या काही महिन्यातच कोरोना लस उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेत आता केंद्र सरकारही लसीकरण मोहिमेचा आराखडा तयार करण्याच्या कामाला लागले असून सर्व राज्याना आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, डॉक्टर-नर्स यांची यादी तयार करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाप्रमाणे मुंबई महानगरपालिकाही जोमात कामाला लागली असून आतापर्यंत १ लाखांहून अधिक कॊरोना योद्ध्यांची अर्थात डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, सफाई कामगार यांची यादी तयार करण्यात आली आहे. तर या यादीतील कॊरोना योद्ध्यांना सर्वप्रथम लस टोचवली जाणार असल्याची माहिती सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महानगर पालिका यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे. तर महत्वाचे म्हणजे, यात केवळ पालिका-सरकारी रुग्णालयातीलच नव्हे तर, खासगी रुग्णालयातील कॊरोना योद्ध्यांचाही समावेश आहे. तर ही यादी आणखी वाढणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
लसीकरण मोहीम आराखडा तयार करण्याला वेग
भारतात ऑक्सफर्डच्या कॊरोना लशीची चाचणी सुरू आहे. ही चाचणी सध्या तिसऱ्या टप्प्यात आहे. तर आता लवकरच पहिल्या भारतीय लसीची अर्थात भारत बायोटेकच्या लसीची चाचणीही सायन रुग्णालयात सुरू होणार आहे. त्याचवेळी रशिया आणि इतर देशातील लस ही लवकरच बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. अशावेळी दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात सर्व नागरिकांना एकाच वेळी लस उपलब्ध करून देणे शक्य होणार नाही. त्यासाठीच केंद्र सरकारने लसीकरण मोहीम हाती घेत टप्याटप्यात लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीच लसीकरण मोहिमेचा आराखडा तयार करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार महाराष्ट्रासह सर्व राज्यात आराखडा तयार करण्यात येत आहे.
रुग्णांच्या थेट संपर्कात येणाऱ्या कॊरोना योध्याना प्राधान्य
केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेचा आराखडा तयार करताना एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तो म्हणजे सर्वात आधी कॊरोना योद्धे अर्थात आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, सफाई कामगार यांना लस देण्यात येणार आहे. त्यासाठीच सरकारी आणि खासगी रुग्णालयातील, दवाखान्यातील डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय यांची यादी तयार करण्यात येत आहे. पालिकेकडूनही या कामाला सुरुवात झाली आहे, असेही काकाणी यांनी सांगितले आहे. महत्वाचे म्हणजे पालिकेने थेट कॊरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या कॊरोना योद्ध्यांना प्राधान्य दिले आहे. त्यानुसार आतापर्यंत १ लाखांहून अधिक कॊरोना योद्ध्यांची नोंद करण्यात आली आहे. यात सरकारी-खासगी रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती काकाणी यांनी दिली आहे.
हेही वाचा -अयोध्या दीपोत्सव! अयोध्येत 5 लाख 51 हजार दिवे उजळणार