मुंबई - हवामानात होणाऱ्या बदलामुळे मान्सून पुढे जाईल का? अशी चिंता निर्माण झाली होती. मात्र, एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. नैऋत्य मोसमी वारे शुक्रवारपर्यंत अंदमान बेटावर पोहचण्याची शक्यता आहे. त्याबरोबर मान्सून ठरलेल्या तारखेनुसारच केरळमध्ये दाखल होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा - 'आता महाराष्ट्रात प्रवेश करायचा असेल तर कोरोनाचाचणी बंधनकारक'
नैऋत्य मोसमी वारे 1 जूनला केरळमध्ये दाखल होतील, असा अंदाज वर्तवला आहे. सध्या हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 21 मेला नैऋत्य मोसमी वारे हे अंदमान बेटांवर पोहोचतील.
केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर सहा दिवसानंतर तो महाराष्ट्र दाखल होतो. 10 जूनपर्यंत मान्सून तळ कोकणातून मुंबईत दाखल होईल. 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्रात मान्सून हजेरी लावेल. यंदा नैऋत्य मॉन्सून सामान्यच्या 98 टक्के राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांत अरबी समुद्रातील वादळामुळे महाराष्ट्रात मान्सून लांबणीवर पडला होता. यावेळी देखील तौक्ते चक्रीवादळामुळे मान्सून लांबीवर पडेल, असे वाटत होते, मात्र हवामान विभागाने दिलेल्या माहितीमुळे उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
अवकाळी पावसाचा फटका
राज्यात मागील महिन्यात बदललेल्या वातावरणामुळे पूर्व मोसमी गारपीटीचा फटका शेतकऱ्यांना बसला होता. शेतातील काढणीला आलेल्या उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये गारपीट देखील झाल्याचे पाहायला मिळाले होते.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मान्सूनचा प्रवेश
देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मान्सूनचा प्रवेश होतो. केरळमध्ये सर्वप्रथम मान्सूनचे आगमन होते. केरळमध्ये दरवर्षी १२० दिवसांच्या पावसाळ्यामध्ये सरासरी २०४.९ सेंटिमीटर मान्सूनची नोंद व्हायची, पण गेल्या वर्षी केरळमध्ये सरासरीच्या तब्बल ९ सेंटिमीटर अधिक म्हणजेच, २२२.७९ सेंटिमीटर इतका पाऊस पडला.
हेही वाचा - 'मराठा आरक्षणाचा खून हा काँग्रेस-राष्ट्रवादीने केला'