मुंबई - शहर व उपनागरात शनिवारी रात्री पासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मुंबईतील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. शहरातील सखल भागाच मोठ्या प्रमाणात पाणी भरले आहे. त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. शहरातील हुिंदमाता, भांडूप, दादर, अंधेरी, सायन, साताक्रुझ कुलाबा, महालक्ष्मी ,वांद्रा या ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. तर बोरीवली पूर्व मध्ये काही गाड्या वाहून गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
सायन रेल्वेस्थानकात रुळावर पाणी-
पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सायन रेल्वेस्थाकातील रेल्वे रुळावर मोठ्याप्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची सेवा ठप्प झाली आहे. तसेच या पावसाच्या पाण्यामुळे कांदिवली पूर्व येथील हनुमान नगरात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याचाय घटना घडल्या आहेत.
पावसाचा अंदाज-
मुंबईत किमान 25 अंश तर कमाल 31 डिग्री तापमानाची नोंद झाली आहे. हवमान विभागाकडून आज मुंबई आणि उपनगरात अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली असून, मध्य मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, बोरिवली पूर्वेकडील शांतीवन भागात दहिसर नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे या भागात पूरसदृश्य परिस्थिती झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहने वाहून जाताना दिसत आहेत.