मुंबई - तौक्ते चक्रीवादळाचा फटका मोनोरेल प्रकल्पालाही बसला आहे. काल, सोमवारी वादळाचा मोठा परिणाम मुंबईत झाला. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे सोमवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) चेंबूर ते जेकब सर्कल मोनो सेवा बंद ठेवली होती. तर आज मंगळवारी मोनो प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल असे वाटत असतानाच आजही मोनो बंद ठेवण्यात आली आहे. काल मोनोरेलच्या ट्रॅकवर झाडाची फांदी पडली होती. ती अजून हटवण्यात आलेली नाही. तेव्हा ही फांदी हटवून ट्रॅक मोकळा केल्यानंतर मोनो सुरू होईल अशी माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे.
मेट्रो सेवा सुरळीत -
तौक्ते वादळाचा धोका मुंबईला असल्याचा इशारा मिळाल्याबरोबर प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या. त्यानुसार एमएमआरडीएने खबरदारी म्हणून सोमवारी मोनो सेवा बंद ठेवली. मात्र त्याचवेळी वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो सेवा सोमवारी वादळवाऱ्यात-पावसात सुरळीत सुरू होती. मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) ने आवश्यक ती काळजी घेत सेवा दिली. सोमवारी वादळाचा वा पावसाचा कोणताही फटका मेट्रो 1 ला बसला नाही. तर आजही मेट्रो 1 सुरळीत सुरू असल्याचे एमएमओपीएलच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.
मोनो स्थानकावर आलेल्या प्रवाश्यांना निराश होऊन परतावे लागले -
मेट्रो सुरळीत असताना मोनो मात्र दुसऱ्या दिवशी ही बंद आहे. काल खबरदारी म्हणून मोनो बंद होती. आज मुंबईत वातावरण बऱ्यापैकी चांगले आहे. त्यामुळे आज सकाळी मोनो सुरू होईल असे म्हटले जात होते. मात्र सकाळपासून मोनोची एकही फेरी झाली नाही. याविषयी एमएमआरडीएला विचारले असता आजही मोनो बंद असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र याची माहिती मुंबईकरापर्यंत पोहचवण्यात आलेली नाही. त्यामुळे जे कुणी प्रवासी मोनो स्थानकावर येत होते त्यांना निराश होऊन परतावे लागलत होते.
ट्रॅक मोकळा झाल्यानंतर मोनो सुरू -
दरम्यान आज मोनो सेवा वादळाचा फटका बसल्याने बंद ठेवण्यात आल्याचे एमएमआरडीएने सांगितले आहे. मोनो ट्रॅकवर झाडाची मोठी फांदी पडली आहे. ही फांदी हटवण्याचे काम सुरू आहे. तेव्हा ट्रॅक मोकळा झाल्यानंतर मोनो सुरू होईल. पण याबाबत ही एमएमआरडीएने अजुन काही ठोस माहिती दिलेली नाही.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांनी वॉर रुममध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्याची गरज - प्रवीण दरेकर