अकोला - दिल्लीत शेतकरी गेल्या 60 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आज या शेतकऱ्यांनी दिल्लीत टॅक्टर रॅली काढली. या रॅलीला हिंसक वळण लागल्याचे समोर आले आहे. यावेळी लाठीहल्ला देखील करण्यात आला. या विरोधात सर्वत्र रोष निर्माण होत आहे. दरम्यान, राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मचिंतन करावे, असा सल्ला दिला आहे.
शेतकऱ्यांच्या डोक्यातून रक्त काढण्याच्या भूमिकेचा निषेध-
अकोला विद्युत भवन येथील कार्यक्रमात राज्यमंत्री बच्चू कडू आले असता, त्यांनी दिल्लीतील शेतकऱ्यांच्याबद्दल झालेल्या घटनेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. दिल्लीत शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली या रॅलीवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. हा प्रकार निषेधार्ह आहे. याचे समर्थन होत नाही. दोन महिने शांत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोक्यातून रक्त काढण्याच्या भूमिकेचा निश्चितच निषेध आहे, असे बच्चू कडू म्हणाले.
आंदोलन उभे करण्याचा इशारा-
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 50 टक्के नफा उभा करू असे म्हटले होते. परंतु, 15 टक्के ही नफा भेटत नाही, असे ते म्हणाले. आपण आत्मचिंतन करा, आत्मचिंतन करून न्याय देण्याची भूमिकाही घ्या, अशी अपेक्षा आम्ही करतो. असा टोला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पंतप्रधान मोदी यांना लगावला आहे. तसेच या घटनेविरोधात आंदोलन उभे करणार असल्याचा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे.
हेही वाचा- येरवडा तुरुंगामधून देशातील पहिल्या 'जेल टुरिझम' उपक्रमाला सुरुवात