मुंबई - देशात ज्या-ज्या ठिकाणी विरोधी पक्षाची सरकारे आहेत. ही सरकारे अस्थिर करून ती पाडण्याचे षडयंत्र भाजपकडून केले जात आहे. असा गंभीर आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्यावरही पोलीस विभागाने आरोप केले होते, तेव्हा त्यांचा राजीनामा घेतला होता का, असा प्रश्नही काँग्रेसने उपस्थित केला आहे. भाजप खासदार डेलकर यांच्या मृत्यू प्रकरणी भाजप का कारवाई करत नाही, असा प्रश्नहीही काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला आहे.
राज्यात सध्या प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ठेवण्यात आलेल्या जिलेटीन असलेल्या गाडीचे प्रकरण गाजत आहे. या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाली आहे. तर पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली झाली आहे. पोलीस आयुक्त पदावरून बदली होताच सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकला आहे. गृहमंत्र्यांनी बारवाल्यांकडून महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्यास सांगितल्याचे सिंग यांनी पत्रात म्हटले आहे. याबाबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर षडयंत्र रचल्याचा आरोप केला आहे.
भाजपचे षडयंत्र -
यावेळी बोलताना, देशात आणि राज्यात चुकीच्या पद्धतीचे वातावरण जाणीवपूर्वक केले जात आहे. जेथे सत्ता नाही त्याठिकाणी साम, दाम, दंड, भेद वापरला जात आहे. मध्य प्रदेश, राजस्थानमध्येही असा प्रयत्न झाला. जनतेने पाठिंबा दिला नसेल तरी तो जबरदस्तीने घेऊन सरकार बनवण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला. सध्या जे प्रकरण सुरू आहे ते स्क्रीपटेड असून त्याप्रमाणे सर्व सुरू आहे असा आरोप त्यांनी केला. एखादा पुरावा समोर आल्याबरोबर लगेच यांच्या बाईट समोर येतात यावरून हे सर्व ठरवून केले जात असल्याचे दिसत असल्याचे सावंत म्हणाले.
मोदी शाह यांचा राजीनामा का नाही -
सरकारवर पोलिसांनी आरोप करण्याचा हा पहिलाच प्रकार नाही. गुजरातचे पोलीस महासंचालक डी. जी. वंजारा यांनी अमित शाह यांच्यावर आरोप केले होते. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना त्यांच्यावरही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आरोप केले होते. त्यावेळी मोदी आणि शाह यांनी राजीनामा दिला होता का, तेव्हा भाजपाने त्यांचा राजीनामा का घेतला नाही असे प्रश्न सावंत यांनी उपस्थित केले. भाजपमध्ये दोन दोन मापदंड आहेत स्वतःला एक आणि दुसऱ्यांना वेगळा असे सावंत म्हणाले.
तेव्हा पत्र का नाही दिले -
पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्यांच्यावर कारवाई होणार हे स्पष्ट झाल्यावर, त्यांची बदली केल्यावर पत्र लिहून आरोप केले आहेत. या पत्राची चौकशी होत असली तरी त्यांना हे फेब्रुबारीमध्ये माहीत झाले होते तर त्यांनी त्यावेळी हे पत्र का लिहिले नाही असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला आहे. डान्सबार मधून पैसे वसूल करायला सांगितले होते असे माजी आयुक्त म्हणतात मात्र कोरोनामुळे बार बंद होते याकडे सावंत यांनी लक्ष वेधले आहे. वाझे फेब्रुवारीत गृहमंत्र्यांना भेटले असे बोलले जात आहे. मात्र त्यावेळी गृहमंत्री कोरोना पॉझिटिव्ह होते याची आठवण सावंत यांनी करून दिली आहे. अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवलेली गाडी ठेवली अशी म्हणणारी संघटना तिहार जेलमधून जबाबदारी स्वीकारते. हा जेल 56 इंच छाती असलेल्या सरकारच्या अखत्यारित येतो असेही सावंत म्हणाले.