मुंबई - मुंबईकरांच्या आरोग्याच्या काळजीपोटी महापालिकेकडून जनजागृती करण्याचे काम केले जाते. यानुसार डेंगी विषयक प्रतिबंधात्मक काळजी घेण्याविषयी नियमितपणे विविध स्तरिय जनजागृती देखील महापालिकेद्वारे सातत्याने करण्यात येत असते. याच जनजागृतीला आता अत्याधुनिक मोबाईल ॲपचे पाठबळ देखील लाभत आहे, ही निश्चितच एक सकारात्मक गोष्ट आहे,” असे नमूद करतानाच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी हे ॲप प्रत्येक मुंबईकर कुटुंबातील किमान एका सदस्याच्या मोबाईलमध्ये असायलाच हवे, असे आवाहन ॲप लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने आज केली आहे.
मुंबई अगेन्स्ट डेंग्यू’ मोबाईल ॲप - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कीटकनाशक विभागाच्या पुढाकाराने व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या ‘मुंबई अगेन्स्ट डेंग्यू’ या मोबाईल ॲपच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थितांशी संवाद साधताना बोलत होते. या कार्यक्रमाला उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कु-हाडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर, उप कीटकनाशक अधिकारी चेतन चौबळ, माहिती तंत्रज्ञान विभागातील व्यवस्थापक अरुण चव्हाण, ॲप विकसित करणा-या ‘आय रियॅलिटीज’ या कंपनीचे प्रसाद आजगांवकर आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी प्रास्ताविक केले. या प्रास्ताविकादरम्यान त्यांनी डेंग्यू उत्पत्ती व प्रसार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली. तसेच डेंग्यूशी लढा देताना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी ही अत्यंत प्रभावी ठरते. त्यामुळेच डेंग्यू आजाराच्या प्रसारास प्रतिबंध करणा-या बाबी अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी ‘मुंबई अगेन्स्ट डेंग्यू’ या भ्रमणध्वनी ॲपची निर्मिती करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. ‘मुंबई अगेन्स्ट डेंग्यू’ हे ॲप पुढील २४ ते ४८ तासांत ‘गुगल प्ले स्टोअर’सह अन्य प्लॅटफॉर्मवर मोफत उपलब्ध असणार आहे.
काय आहे डेंग्यू आजार -
· डेंग्यू हा एक प्राणघातक आजार आहे. या आजाराचा प्रसार 'एडीस इजिप्टाय' या डासांद्वारे होतो. या डासांच्या उत्पत्तीस प्रतिबंध करणे, हाच या आजाराचा मुकाबला करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे.
· गेल्या काही वर्षातील आकडेवारी बघितली असता एकूण डेंग्यूबाधित रुग्णांपैकी सुमारे ८० टक्के रुग्णांच्या घरामध्ये किंवा घराशेजारील परिसरात डेंग्यू विषाणूंचा प्रसार करणा-या 'एडीस इजिप्टाय' डासांची उत्पत्ती स्थाने आढळून आली होती. डेंग्यूच्या विषाणूंचा प्रसार करणा-या या डासांची उत्पत्ती ही साचलेल्या किंवा साठविलेल्या स्वच्छ पाण्यातच होते.
· सर्वेक्षणातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार डेंग्यू विषाणू वाहक डासांच्या अळ्या प्राधान्याने पाण्याचा पिंप, फेंगशुई झाड, बांबू प्लॅन्ट्स, मनीप्लँट्स यासारखी शोभिवंत झाडे; घराच्या सज्जामध्ये (गॅलरी) किंवा सभोवताली झाडांच्या कुंड्यांमधील अतिरिक्त पाणी जमा होण्यासाठी ठेवण्यात येणा-या प्लेट्स, वातानुकुलन यंत्रणा, शीतकपाटाचा (रेफ्रिजरेटर) डिफ्रॉस्ट ट्रे यासारख्या विविध स्रोतांमध्ये अल्प प्रमाणात असलेल्या स्वच्छ पाण्यात देखील या डासांची उत्पत्ती आढळून आली आहे.
· डेंग्यू डासाची उत्पत्तीस्थाने ही घरामध्ये असल्याने घराच्या अंतर्गत स्तरावर असण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे घर आणि सोसायट्यांच्या अंतर्गत स्तरावर सातत्याने काळजीपूर्वक पाहणी करणे, अत्यंत आवश्यक असते. ही पाहणी नक्की कशी करावी, त्यात कोणत्या बाबी पहाव्यात, याची माहिती नागरिकांना सहजपणे मिळावी, या उद्देशाने ‘मुंबई अगेन्स्ट डेंग्यू’ हे मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे.
· डेंग्यू प्रसार करणा-या डासांच्या उत्पत्तीस प्रतिबंध, हीच सर्वात प्रभावी उपाययोजना असल्याने प्रत्येक मुंबईकराने आपल्या अँड्रॉइड किंवा आयओएस आधारित मोबाईलमध्ये हे ॲप इन्स्टॉल करावे आणि ॲपमध्ये देण्यात येणा-या मार्गदर्शक सुचनांनुसार आपल्याच घराची पाहणी करुन आवश्यक तिथे योग्य त्या सुधारणा तातडीने करवून घ्याव्यात, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कीटकनाशक खात्याद्वारे करण्यात आले आहे.