मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी भेसळयुक्त मावा पकडला आहे. अहमदाबाद महामार्गावर चारोटी टोल नाका येथे हा मावा पकडला. वोल्वो बसमधून गुजरातहून मुंबईत हा भेसळयुक्त मावा आणला जात होता. हा मावा 4 ते 5 टन असून माव्याची वाहतूक व साठवणूक करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी होत आहे.
दिवाळीच्या दरम्यान फराळ तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कच्च्या मालाची खरेदी केली जाते. पण या पदार्थांचा दर्जा आणि ते साठवण्याची पद्धत यामध्ये असलेल्या त्रुटींमुळे ग्राहकांचे आरोग्य धोक्यात येते. आज भेसळयुक्त माव्याची वाहतूक होत असल्याची माहिती नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती.
सावधान! 300 टन भेसळयुक्त मावा मुंबईत येणार -
या माहितीच्या आधारे मनसैनिकांनी आज मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चारोटी टोल नाका येथे बस रोखून झडती घेतली. तर त्या बसमध्ये 4 ते 5 टन भेसळयुक्त मावा आढळून आला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 300 टन भेसळयुक्त मावा मुंबईत येणार असल्याचे मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.
मनसैनिकांची कारवाईची मागणी -
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त माव्याला मोठी मागणी असते. भेसळयुक्त माव्यापासून मिठाई व खाद्यपदार्थ तयार करून याद्वारे नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जातो. त्यामुळे भेसळयुक्त मालाची वाहतूक व भेसळयुक्त मावा पासून मिठाई बनवणाऱ्यांवर कारवाईची मागणी मनसैनिकांनी केली आहे.
हेही वाचा- टीआरपी घोटाळा: पोलिसांनी विनाकारण त्रास देऊ नये; 'हंस'च्या याचिकेवर न्यायालयाची पोलिसांना सूचना